लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : निवडणुकीला रातोरात स्थगिती, राजकीय आरोप-प्रत्यारोप, मतदारयादीवर आक्षेप आणि न्यायालयातील लढाई आदी विविध कारणांमुळे चर्चेच्या विषय बनलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला असून विद्यार्थी संघटनांची प्रतीक्षा संपली आहे. गणेशोत्सवानंतर नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठी रविवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शनिवार, ३ ऑगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासनाने निवडणूक अधिसूचना जाहीर केली. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही अनुसूचित जाती (१), अनुसूचित जमाती (१), विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती (१), इतर मागास वर्ग (१), महिला (१) आणि खुला प्रवर्ग (५) अशा एकूण १० जागांसाठी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज विद्यापीठाच्या या संकेस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ किंवा या संकेतस्थळावर ‘लॉगिन/ रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करून मंगळवार, ६ ऑगस्टपासून भरता येईल. तर सोमवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आणखी वाचा-मुंबई : सलग सुट्ट्यांमुळे रेल्वेची प्रतीक्षा यादी पूर्ण त्यानंतर शुक्रवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील फिरोजशाह मेहता सभागृहात (व्यवस्थापन परिषदेचे दालन) होणार आहे. मग मंगळवार, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. सोमवार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत फोर्ट संकुलातील पहिल्या मजल्यावरील निवडणूक विभागात जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे आणि मग बुधवार, २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या या संकेस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ किंवा या संकेतस्थळावर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, याचवेळी मतदान केंद्रांची नावेही जाहीर करण्यात येतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान आणि बुधवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या निवडणुकीबाबत विद्यार्थी संघटनांना उत्सुकता होती. अखेर या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे मतदारांच्या जुळवाजुळवीपासून ते विजय प्राप्त करेपर्यंत, विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार चुरस रंगणार हे निश्चित आहे. आणखी वाचा-Mumbai Crime : धक्कादायक! सोसायटी मिटिंगमध्ये वाद, अध्यक्षाने चक्क दाताने सदस्याचा अंगठा तोडला; घटनेने खळबळ १३ हजार ४०६ पदवीधर मतदार नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठी २६ हजार ९४४ पदवीधरांनी नोंदणी केली होती या एकूण नोंदणीपैकी ५० टक्के पदवीधर मतदारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. अंतिम मतदारयादीनुसार १३ हजार ४०६ पदवीधरांचे मतदार अर्ज पात्र, तर विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १३ हजार ५३८ पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरले आहेत. निवडणूक स्थगितीचा मुद्दा हा न्यायालयातही जाऊन पोहोचला. त्यानंतर विद्यापीठाने निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करीत जुनी मतदारयादी रद्द केली आणि सर्व पदवीधरांना पुन्हा नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज भरावे लागले. मात्र, त्यानंतर मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पदवीधरांनी अधिसभा निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे मत विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त होते आहे.