मुंबई : प्रवासी क्षमता वाढविण्यासाठी मोटरकोच डब्यातील उपकरणे वातानुकूलित लोकलच्या डब्याखाली बसविण्यात आली असून प्रवासी क्षमता वाढविण्यात आलेली ही पहिलीपहिली वातानुकूलित लोकल लवकरच पश्चिम रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहे. या लोकलची चाचणी सुरू असून चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही लोकल सेवेत दाखल करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वे करीत असल्याची माहिती जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये धावली. या लोकल सेवेला सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र तिकीट दरात कपात होताच प्रतिसाद वाढू लागला आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत होत्या.

प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे १ ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या ७९ झाली.सध्या पश्चिम रेल्वेकडे सहा वातानुकूलित लोकल आहेत. या लोकलमधील उपकरणे डब्याखाली बसविण्यात आली असून ही नवी वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या लोकलची चाचणी सुरू होती. उपकरणे डब्याखाली असल्याने कोणतीही तांत्रिक समस्या उद््भवण्याची शक्यता आहे. परिणामी, या लोकलची चाचणी घेण्यात येत होती. चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही लोकल सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नियोजन सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा : मुंबई : स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक ; ११ जणांविरोधात तक्रार

बारा डब्याच्या सामान्य लोकल गाडीला तीन मोटरकोच असतात. या मोटरकोचमध्ये पेंटाग्राफ, तसेच डब्यातील पंखे, दिवे यांसह अन्य यंत्रणा हाताळण्यासाठी उपकरणे असतात. तसेच सध्या सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडीलाही अशी स्वतंत्र यंत्रणा असल्याने प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. वातानुकूलित लोकलमधील ही उपकरणे लोकल डब्याच्या खाली बसवून प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढणार आहे.बारा डबा सामान्य लोकलमध्ये पेंटाग्राफ आणि अन्य काही यंत्रणांसाठी स्वतंत्र असे तीन मोटरकोच असतात. सध्या सेवेत असलेल्या भेल कंपनीच्या सहा वातानुकूलित लोकलमध्येही यासाठी स्वतंत्र डबे आहेत. मात्र सेवेत दाखल होणाऱ्या सातव्या लोकलमधील उपकरणे डब्याखाली बसविण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा

त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकलच्या तुलनेत नव्या लोकलमधील प्रवासी क्षमतेत काही प्रमाणात वाढ होणार आहे. सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकलमधून एक हजार २८ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून नव्या वातानुकूलित लोकलमधून एक हजार ११८ हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. नव्या लोकलची चाचणी झाली असून ती प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती सुमित ठाकूर यांनी दिली. नव्या वातानुकूलित लोकलमध्ये वजनाने हलके असलेले सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. या सोलर पॅनलमध्ये ३.६० किलोवॅट वीज निर्माण करण्याची क्षमता असून त्याचा वापर डब्यातील दिवे, पंख्यासाठी करण्यात येणार आहे.