मुंबई : मोटारसायकल अपघातामध्ये पाय गमावल्यानंतर अंधकारमय झालेले आयुष्य, तीन बहिणींची जबाबदारी यातून नैराश्याच्या गर्तेत जात असलेला जगदीश ठाकरे (२८) या तरुणाला जी.टी. रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाकडून कृत्रिम पाय मिळाला. त्यानंतर जगदीशने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत थेट पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे क्रिकेटचे प्रतिनिध्वत करण्याचे स्वप्न बघत सरावाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पात विशेष सुविधा देणे बंधनकारकच आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा महारेराचा मसुदा जाहीर

भिवंडी येथे वास्तव्याला असलेला जगदीश ठाकरे याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये वज्रेश्वरी येथे मोटारसायकल अपघात झाला. या अपघातामध्ये त्याला उजवा पाय गुडघ्यापासून गमवावा लागला. वडीलांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यापासून संबंध तोडले होते. यामुळे जगदीशच्या लहान भावाने आत्महत्या केली. सामाजिक आयुष्य विवंचनेत जगणाऱ्या जगदीशसमोर अपघाताने आर्थिक संकटही ओढावले. चार बहिणींची जबाबदारी खांद्यावर असल्याने जगदीशला पुढील आयुष्य अंधकारमय दिसत होते. पायावरील शस्त्रक्रियेसाठी जगदीशच्या बहिणींनी स्थानिक आमदार, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाबरोबरच गावकऱ्यांनीही मदतीचा हात नाकारला. शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने शक्य तेथे मदतीसाठी प्रयत्न सुरू असताना पालघर जिल्ह्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी त्याला जी.टी. रुग्णालयातील समाजसेवा विभागाचे अधीक्षक विजय गायकवाड यांच्याकडे पाठविले.

हेही वाचा >>> महिलांच्या हितासाठी कौटुंबिक अत्याचाराचे ४९८ ए कलम दंडात्मक करू शकत नाही, भूमिकेचा केंद्र सरकारतर्फे उच्च न्यायालयात पुनरूच्चार

जगदीश व त्याच्या बहिणीने विजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी समाजसेवा विभागामार्फत कृत्रिम पाय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गायकवाड यांनी जगदीशला मानसिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी समुपदेशन करून त्याला ऑटोबॉक कंपनीचा कृत्रिम पाय बसविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे स्वत:च्या पायावर उभे राहण्याबरोबरच जगदीशच्या स्वप्नांना नवी पालवी फुटली. जगदीशला क्रिकेटची आवड असल्याने ऑटोबॉकने त्याला व्हिलचेअर क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. जगदीशने भारतीय संघासोबत सराव केला असून, पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी तो कसून सराव करीत आहे.

कृत्रिम पायासाठी सात लाख खर्च

ऑलिम्पिक दर्जाच्या कृत्रिम पायासाठी साधारणपणे सहा ते सात लाख रुपये खर्च येतो. जी.टी. रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाने टाटा ट्रस्ट, चेतना फाऊंडेशन, सुशिला मोदी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निधी जमा करून त्याला कृत्रिम पाय बसवला. तसेच ठाणे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाईन आर्ट्सच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या जगदीशला शैक्षणिक मदतही केली.

समाजसेवा विभागाची भूमिका महत्त्वाची

महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना पाच लाखांपर्यंत उपचार मोफत करण्यात  येत असले तरी अनेक आजारांसाठी त्यापेक्षा अधिक खर्च येतो. अशावेळी गरीब रुग्णांसाठी रुग्णालयातील समाजसेवा विभाग दानशूर व्यक्ती व व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीच्या माध्यमातून खर्चाचा भार उचलतात. त्यामुळे रुग्णांवरील पुढील उपचारही मोफत होतात, अशी माहिती जी.टी. रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाचे अधीक्षक विजय गायकवाड यांनी दिली.

क्रिकेटबरोबरच अन्य खेळांसाठीही प्रयत्न

मी उत्तम क्रिकेट खेळत असल्याने पॅराऑलिम्पिकसाठी मला क्रिकेटचा सराव करण्यास सांगण्यात आले. मात्र जितक्या खेळांमध्ये मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, तेवढ्या सर्व खेळांमध्ये निवड व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जी.टी. रुग्णालयातील समाजसेवा विभागाच्या विजय गायकवाड यांच्यामुळेच मी दोन्ही पायावर उभा राहू शकलो. – जगदीश ठाकरे