scorecardresearch

मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग सुरु होणार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री करणार उद्घाटन

‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ अ’ मार्गावरील काही भागात प्रवासी वाहतुक सुरु होणार आहे

मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरु होत आहे. सात वर्षांपूर्वी जुन २०१४ ला मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा हा प्रवासी वाहतुकीकरता सुरु झाला. त्यानंतर मुंबईत एकुण पाच मेट्रो मार्गांच्या कामाला टप्प्याटप्प्याने सुरु झाली. यापैकी दोन मेट्रो मार्गावरील काही भागात प्रवासी वाहतुक अखेर सुरु होणार आहे. ‘मेट्रो ७’ ( Metro 7 ) आणि ‘मेट्रो २ अ’ ( Metro 2 A ) च्या सुमारे २० किलोमीटर मार्गावर येत्या शनिवारपासून मेट्रो आता प्रवाशांना घेऊन धावणार आहे.

येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांचे भुमिपुजन हे ऑक्टोबर २०१५ मध्ये झाले होते. २०१६ मध्ये या दोन्ही मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. २०२१ पर्यंत हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि टाळेबंदी यामुळे या मेट्रो मार्गाच्या कामावर परिणाम झाला. अखेर विविध अडथळे पार होत काही महिन्यांपूर्वी या मेट्रो मार्गावर प्रत्यक्ष मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात झाली आणि अखेर येत्या शनिवारी या दोन्ही मार्गावरील काही टप्पे हे प्रवासी वाहतुकीकरता सुरु होत आहेत.

मेट्रो २ अ हा मार्ग डीएन नगर ते दहिसर पश्चिम असा एकुण १८.५ किलोमीटर लांबीचा, प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील लिंक रोडला समांतर जात असून या मार्गावर एकुण १७ मेट्रो स्थानके आहेत. तर मेट्रो ७ हा अंधेरी ते दहिसर पूर्व असा पश्चिम द्रुतगती मार्गावरुन जाणारा १६.६ किलोमीटरचा मार्ग असून यावर एकुण १३ मेट्रो स्थानके आहेत. हे दोन्ही मार्ग दहिसर भागात एकमेकांना जोडले गेले आहेत हे विशेष. या दोन्ही मार्गांवरील दहिसरच्या दिशेकडचा काही भाग हा प्रवासी वाहतुकीकरता खुला होणार आहे.

शनिवारपासून या दोन्ही मेट्रो मार्गावरील एकुण २० किलोमीटर मार्गावरुन मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहे. तर हे वर्ष संपायच्या आत हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) चे हे दोन्ही मेट्रोचे मार्ग पुर्णपणे वाहतुकीकरता सुरु झालेले असतील. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे पश्चिम उपनगरातील लाखो लोकांना प्रवासी वाहतुकीचा एक नवा आणि जलद असा पर्याय उपलब्ध होणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांवर कमीत कमी १० रुपये असा तिकीटाचा दर निश्चित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After seven years two metro routes will be started in mumbai chief minister will inaugurate on the occasion of gudipadva asj

ताज्या बातम्या