भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी माध्यमांना याबाबत माहिती देताना सांगितले की, “१५ विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील आमच्या ताकदीच्या आधारावर त्यातलं आवश्यक तेवढं यश हे संरक्षित करण्याची योजना देखील आम्ही बनवलेली आहे. राजकीय विश्लेषण संपूर्ण राज्याचं, महाविकास आघाडीच्या कुकृत्याचं, गैरकारभाराचं आणि भ्रष्टाचाराचं या विषयी देखील एक पेपर बनवून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातलं सरकार या बद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे तिन्ही पक्ष कधी एकत्र, कधी विरोधात म्हणून करत आहेत. असत्याच्या पेरणीच्या आधारावर यशाच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो सफल होऊच शकत नाही, महाराष्ट्रातील जनता त्याला थारा देऊ शकत नाही. त्यामुळे या बदनामीला सुरूवात करणाऱ्या या नेत्यांच्या विरोधात, या पक्षांच्या विरोधात देखील भांडाफोड सुनियोजित पद्धतीने करण्याचा आम्ही कार्यक्रम आयोजित करणार आहोत.

याचबरोबर “महाराष्ट्रातील जनतेला जे आवश्यक आहे, तो विकास मिळतच नाही. सिंचनात, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, बारा बलुतेदारांना, दलित बांधवांना, मराठा, ओबीसींना कुणालाच मिळत नाही. त्यामुळे एका अर्थाने ते देऊच शकत नाही असं, हे महाविकासआघाडीचं ठाकरे सरकार आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या अधिकाराचं, हक्काचं मिळवून देण्यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रमाची रुपरेषा देखील आम्ही करत आहोत. येणारा काळ हा महाराष्ट्र विकास आघाडीला, महाराष्ट्रातील जनतेला विकासापासून दूर नेण्याचं जे ते काम करत आहेत. त्याविरोधता सळो की पळो करण्याचा आम्ही ठरवलं आहे. केंद्र सरकारचे कार्यक्रम योजना थेट जनतेपर्यंत पोहचवणार आहोत आणि निवडणुकांच्या योजना या आम्ही करत आहोत.” असं शेलार यांनी यावेळी सांगितलं.