मुंबई: राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आरोग्य विभागाने त्यास संमती दिली आहे. पण करोनाच्या नव्या प्रकारामुळे याबाबत पुन्हा एक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.

 नवीन विषाणू सापडल्याने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी घालण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. त्यांनी अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

करोनाचा सापडलेला नवा विषाणू लसीला निष्प्रभ करून वाढतो, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हा काळजी करण्यासारखा विषाणूचा प्रकार आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने केंद्राला याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनीही दक्षिण आफ्रिकेवरून येणारी विमाने थांबविण्याची विनंती केली आहे. केंद्र शासन काय निर्णय घेणार आहे याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.