मुंबई : गेले पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोड येथील सिल्व्हर ओक या निवास्थानी आंदोलन केले. आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पल आणि दगडफेकही केली. 

याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २३ महिला आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेमागे कोण आहे, त्याचा तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आंदोलक कसे घुसले, गुप्तचर विभागाला त्याची काही माहिती मिळाली नाही का, याचाही तपास केला जाईल. तशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती वळसे यांनी दिली.

आझाद मैदानावर गेल्या पाच महिन्यांपासून सहकुटुंब शांततेत धरणे धरून बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. मात्र शुक्रवारी दुपारी ३ ते साडेतीनच्या दरम्यान सुमारे २५० एसटी कर्मचारी पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर चप्पल आणि दगडांचा मारा करीत धडकले. त्यात महिलाही होत्या.

आंदोलक सिल्व्हर ओकवर पोहोचले तेव्हा शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय घरीच होते. आंदोलक घोषणाबाजी, दगडफेक करीत असतानाही खासदार सुप्रिया सुळे घराबाहेर आल्या आणि त्यांनी आंदोलकांना हात जोडून शांत होण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी घोषणाबाजी करीत आणखी गोंधळ घातला. विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नाही, म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे काहींनी माध्यमांना सांगितले. सुरक्षारक्षकांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. या प्रकाराची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही पवार यांच्या निवास्थानी धावले. दोन्ही बाजूनी घोषणाबाजी सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळेत पोलिसांची कुमक दाखल झाली आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सिल्व्हर ओकवर दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाचा तीव्र निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या आंदोलकांच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

एसटीतील कर्मचारी संघटनांनीही या घटनेचा निषेध केला. संपकरी कर्मचाऱ्यांची नेतृत्वाकडूनच फसवणूक झाल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. विलीनीकरण, सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी संपाचे नेतृत्व करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरू आहे, असे संघटनांनी म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून एसटीच्या विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाची मागणी सोडून राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्याची दखल घेत, एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कर्मचाऱ्यांवर २२ एप्रिलनंतर कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे संपकरी एसटी कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारे परिपत्रक एसटी महामंडळाने शुक्रवारी जारी केले.

समाजमाध्यमांद्वारे चिथावणी..

अ‍ॅड्. गुणरतन सदावर्ते, त्यांची पत्नी जयश्री आणि त्यांच्या मुलीचे छायाचित्र असलेल्या फलकाची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून शुक्रवारी सकाळपासून प्रसारित झाली होती. या फलकावर ‘‘सावधान शरद, सावधान शरद, सावधान शरद’’ असा मजकूर होता. त्याचबरोबर ‘एसटी कर्मचाऱ्यांचे गिरणी कामगारांप्रमाणे हाल होतील, असे म्हणणाऱ्यांची जीभ झडेल हो!’ असेही लिहिण्यात आले होते.

पोलिसांचे अपयश?

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे सर्वच यंत्रणा गाफील होत्या. पण ही घटना म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंदोलक पवार यांच्या घराच्या परिसरात आले तेव्हा तेथे पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे आंदोलकांनी थेट पवारांच्या घराच्या दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी केली.

राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न: गृहमंत्री

एसटी कर्मचाऱ्यांआडून राज्यात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि शक्ती करत आहेत. हा प्रकार त्याच प्रयत्नांचा एक भाग होता, असा आरोप गृहमंत्री वळसे पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यांबाबत पोलीस चौकशी करतील. त्यानंतर कारवाई निश्चित होईल, असे वळसे म्हणाले.

कठोर कारवाई करा : जयंत पाटील

शरद पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक करणाऱ्यांचे कर्तेकरविते कोण आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आजपर्यंत महाराष्ट्रात नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते, मात्र हा प्रकार निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.

हल्ला निषेधार्ह : पटोले

शरद पवार यांच्या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. आंदोलकांना चिथावणी देणारे कोण आहेत, त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या भोईवाडा येथील निवासस्थानाहून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझी हत्या होऊ शकते, दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात माझ्या पत्नीने तक्रार दिली आहे, अशी प्रतिक्रिया सदावर्ते यांनी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी : पवार

राजकारणात मतभेद, संघर्ष होत असतो, परंतु अशा प्रकारे टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. नैराश्यातून हा प्रकार घडला आहे, तरीही मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र चुकीच्या नेतृत्वाचे समर्थन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. कर्मचाऱ्यांचे जे नेतृत्व अतिटोकाची भूमिका घेते, तेच आत्महत्या किंवा तत्सम गोष्टींना जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री