चित्रपट अभिनेता संजय दत्त जामीनावर सुटल्यावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करण्याविरोधात उभ्या राहिलेल्या राजकीय, सामाजिक संघटना सर्वोच्च न्यायालयानेही त्याला शिक्षा सुनावल्यानंतर गप्प कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांनी आपण वैयक्तिक पातळीवर संजयवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. मात्र गेल्या काही वर्षांत संजयने अशी काय जादू केली, की शिक्षा झाल्यावर मात्र त्याचे सहानुभूतीदारच पुढे आले आहेत.
दरम्यान, संजयने शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर केली आहे. तर राज्यपालांनी संजयच्या शिक्षा माफीबाबत विविध मान्यवरांनी दिलेले निवेदन राज्य सरकारकडे पाठविले आहे.
टाडा न्यायालयात खटला सुरु असताना काही संघटनांनी त्याच्या चित्रपटांविरोधात आंदोलने सुरू केली होती. अनेक ठिकाणी तोडफोडीचे प्रकार झाले होते. शासकीय व खासगी दूरचित्रवाणीवाहिन्यांवरही संजयचे चित्रपट दाखविणे बंद करण्यात आले होते. न्यायालयाने दोषी ठरविण्याआधी जनमत तापविणाऱ्या संघटना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर मात्र शांत राहिल्या आहेत. केवळ नाना पाटेकर यांनी आपण संजयवर व त्याच्या चित्रपटांवर वैयक्तिक बहिष्कार टाकला असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संजयनेही सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर केली असून त्यावर पुढील आठवडय़ात सुनावणी अपेक्षित आहे. ज्या खंडपीठाने शिक्षा सुनावली, त्यांच्यापुढेच ही सुनावणी होईल. टाडा कायद्यातून मुक्त केले असतानाही त्यानुसार नोंदविलेला कबुलीजबाब ग्राह्य़ धरून भारतीय दंडविधानातील तरतुदीनुसार शिक्षा ठोठावणे योग्य नाही. संजयविरूध्द केवळ हा कबुलीजबाब मुख्य पुरावा असून टाडा कायद्या व्यतिरिक्त भारतीय दंडविधान किंवा फौजदारी दंड संहितेत आरोपीच्या कबुलीजबाबाला कोणतेही महत्व नाही, असे मुद्दे मांडण्यात आले आहेत.