मुंबई : ‘शेतकरी’ मासिकाच्या पुनरुज्जीवनासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे. मासिकाची डिजिटल आवृत्ती विकसित करण्यात येत आहे. समाज माध्यमे व संकेतस्थळाद्वारे मासिकाचा पोहोच वाढवण्याचा उपक्रम सुरू आहे, असे शेतकरी मासिकाच्या संपादकांनी म्हटले आहे. ‘नियोजनाच्या दुष्काळामुळे ‘शेतकरी’ मासिक मरणपंथाला’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीवर खुलासा करताना वस्तुस्थितीपासून दूर जाऊन एकतर्फी प्रतिमा उभी करण्यात आल्याचे मत नोंदविण्यात आले आहे.

शेतकरी मासिकाची स्थापना १९६५ मध्ये वसंतराव नाईक यांच्या संकल्पनेतून झाली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती, नवोपक्रम, संशोधन आणि धोरणात्मक माहिती पोहोचविण्याचे कार्य हे मासिक गेली सहा दशके करीत आहे. वर्तमान काळात वाचकांच्या सवयींमध्ये झालेला बदल, टपाल सेवा व मुद्रण वितरण प्रक्रियेतील अडचणी, तसेच खर्चात झालेली वाढ ही आव्हाने आहेत, याची आम्ही पूर्ण जाणीव ठेवून आहोत, असे संपादकांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासिकाच्या पुनरुज्जीवनासाठी कृषी विभाग पूर्णपणे कटिबद्ध आहे. नामवंत तज्ज्ञ, शेतकरी, अभ्यासक व नवउद्योजक यांचा संपादकीय सहभाग वाढविण्यात येत आहे. वितरण साखळी सशक्त करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना राबविल्या जात आहेत. ‘शेतकरी’ मासिक हे केवळ एक मुद्रित माध्यम न राहता, आधुनिक माहिती प्रसारणाचे प्रभावी व्यासपीठ म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी शासन व संपादकीय मंडळ प्रयत्नशील आहे, असेही शेतकरी मासिकाच्या संपादकांनी म्हटले आहे.