शरद पवार यांची पंतप्रधानांवर टीका

चंद्रपूर : कृषी हा राज्याशी संबंधित विषय आहे. त्यामुळे राज्यांची मते जाणून घेत सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यायचा असतो. त्यावर सखोल चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकारने शेतकरी, संघटना, तज्ज्ञांची मते जाणून न घेता अवघ्या काही तासात गोंधळात कायदे मंजूर केले. आडमुठी भूमिका घेत वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. आता पंजाब, उत्तर प्रदेश निवडणुकीत स्पष्ट पराभव दिसायला लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.

चंद्रपुरात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ‘कृषी हा राजकीय विषय नाही. यावर सखोल चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र  केंद्रातील भाजप सरकारने कुणाशीही चर्चा केली नाही. गोंधळात कायदे मंजूर करून घेतले. त्यामुळे देशात कृषी कायद्यांना विरोध करण्यात आला. आता आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व संघटनांनी चर्चा करून आंदोलनाच्या समाप्तीबाबतचा निर्णय घ्यावा. या काळात शेतकऱ्यांनी शांततेत केलेल्या इतिहासातील या सर्वात मोठ्या आंदोलनाला सलाम आणि सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन,’ असे पवार म्हणाले.