मुंबई : बीड जिल्ह्यातील शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) नोंदणी प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्याची दखल घेऊन त्या दुरुस्त करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. एका महिन्याच्या आत आवश्यक त्या सुधारणा या शेतकरी ओळखपत्रात करण्यात येतील, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

देशातील कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशनचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र देण्यात आले आहे. या ओळखपत्राचा शासनाच्या अनेक योजनांसाठी उपयोग होत आहे. या ओळखपत्रात अनेक तांत्रिक अडचणी आढळून आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीचे कमी जास्त क्षेत्रफळ नमूद करण्यात आले आहे. जमिन नोंदणीचा आदलाबदल झाली आहे. या त्रुटीमुळे शेतकऱ्यांच्यात संताप पसरला आहे. अशी लक्षवेधी सदस्य विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी मांडली.

देशात ॲग्रीस्टॅक या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती, त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश होता. बीडमध्ये सुमारे २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व तांत्रिक त्रुटी एका महिन्याच्या आत दुरुस्त केल्या जातील, असे भरणे यांनी स्पष्ट केले.