मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिक्षणशास्त्र (बीएड) या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत उपलब्ध जागांची संख्या ३२ हजार ७७८ होती, त्यापैकी १८ हजार २७५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
तर पहिल्या फेरीसाठी ५५ हजार १९८ विद्यार्थ्यांनी पसंती दाखविली होती. बीएड या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ६३ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत ५५ हजार १९८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार पहिल्या केंद्रीभूत फेरीसाठी करण्यात आला.
पहिल्या फेरीच्या वाटपासाठी राज्यात ४६३ बीएड महाविद्यालयात ३२ हजार ७७८ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी १८ हजार २७५ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयांत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी ७ ते १० सप्टेंबरदरम्यान मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
