मुंबई : ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस रेल्वे उड्डाणपुलाचे नाव बदलण्यात येणार असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा होणार असून दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव परिसरातील पूर्व – पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.

दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचा बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व – पश्चिम वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. बेलासिस पूल कार्यान्वित झाल्यावर जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचा बेलासिस रोड), दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

या पुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले, मात्र पूल बांधून पूर्ण झाला तरी त्याचे लोकार्पण होत नव्हते. पूल कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या पुलाचे नाव बदलण्यासाठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी मंत्री लोढा यांनी केली होती.

मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी, २६ फेब्रुवारी रोजी या पुलाचे उद्घाटन होणार आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील कर्नाक पूलाचे ‘सिंदूर’ असे नामांतर केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होते.

१३० वर्ष जुना पूल….

मुंबई सेंट्रल स्थानकानजीक रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले. ब्रिटिशकालीन १३० वर्षं जुना बेलासिस पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकरीता पालिका प्रशासनाने कालमर्यादा निश्चित केली होती. मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ज्या पुलांची कामे हाती घेतली त्यांची कामे रखडल्यामुळे मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, बेलासिस पुलाचे काम ठरलेल्या वेळेच्या चार महिने आधीच पूर्ण करण्यात आले आहे.