मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी प्राणी कल्याण मंडळाकडून मिळणारा निधी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना द्या, असे मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २००७मध्ये मुंबई महापालिकेला बजावले. अजूनही हे पैसे महापालिकेकडून मिळालेले नाहीत, पण संस्थेतील ‘जीवनदान’ थांबलेले नाही.. महापालिकेकडून सुमारे ४० लाख रुपयांचा निधी पदरात पाडून घ्यायचा असेल, तर काही टक्क्यांवर ‘उदक’ सोडा, असे अप्रत्यक्षपणे सुचविले गेले, पण दानयज्ञातूनच कारभार करणाऱ्या या संस्थेला ते मान्य नाही. साहजिकच, प्रसंगी स्वत:च्याच खिशात हात घालून संस्थेचे कार्यकर्ते व सहानुभूतीदार खर्चाची हातमिळवणी करतात.
मुंबईतील मालाड पश्चिम येथे गेल्या १९ वर्षांपासून भटकी कुत्री आणि भरकटलेल्या प्राण्यांना जीवदान देण्याचे व्रत घेतलेल्या ‘अहिंसा’ या संस्थेची ही कहाणी.. माणसाच्या आसपास वावरणारे प्राणी संरक्षणासाठी माणसावरच निर्भर असतात. माणसाच्या प्राणीप्रेमावर आश्वस्त असलेले हे प्राणी कधी कधी उपद्रवकारी ठरतात, त्यांच्या विरोधात असंतोषही उफाळतो आणि त्याच्या अतिरेकामुळे अशा प्राण्यांचे जीवनच संकटात सापडते. विशेषत: भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी अधिक असतात. अशा कुत्र्यांचे जगणेच हिरावून घेण्याची एक क्रूर पद्धत काही वर्षांपूर्वी महापालिकेने सुरू केली होती. भटक्या कुत्र्यांना गाडीत कोंबून मालाड डम्पिंग ग्राऊंडशेजारील कोंडवाडय़ातील एका चेंबरमध्ये फेकून विजेचा शॉक देऊन त्यांना मारले जात असे.
जैन समाजातील एक गट या क्रूरपणामुळे अस्वस्थ झाला. काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि ही अमानुष पद्धत बंद झाली. या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी त्यांना पकडून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचा उपाय पुढे आला आणि तसे करण्याची तयारी अहिंसाने दर्शविली. प्रत्येक शस्त्रक्रियेमागे साडेतीनशे रुपयांचा निधी यानुसार वर्षांकाठी सुमारे अडीच हजार शस्त्रक्रियांपोटी महापालिकेकडून ३७ लाख रुपयांचा निधी अद्याप बाकी आहे. पाच-दहा टक्क्यांची ‘खिरापत’ वाटली तर हे पैसे मिळू शकतात, पण मुळातच लोकांच्या पैशातून चालणाऱ्या या संस्थेचा पैसा असा वाया घालवायचा नाही, असा अहिंसाचा निर्धार आहे!