मुंबई : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या एआय-१७१ अपघाताच्या तपासात बोईंग ७८७विमानाच्या विद्युत, इलेक्ट्रॉनिक, एव्हिऑनिक्स आणि एकात्मिक प्रणालींची सखोल तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी ”फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स”ने केली आहे. यासंदर्भात संघटनेने १८ सप्टेंबर रोजी विमान अपघात तपास ब्युरोच्या (एएआयबी) महासंचालकांना पत्र पाठवले आहे. अपघाताचा अंतिम तपास अहवाल ऑक्टोबर महिन्यात येणे अपेक्षित आहे. अंतिम अहवाल येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना ही नवीन मागणी केली आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात एअऱ इंडियाच्या एआय़ -१७१ बोईंग विमानाचा अहमदाबाद येथे भीषण अपघात झाला होता. उड्डाणाच्या अवघ्या काही मिनिटांत विमान एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोसळले होते. या अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. परिणामी विमानाशी संबंधित प्रत्येक तांत्रिक बाबीची पुराव्यावर आधारित, बारकाईने तपासणी होणे आवश्यक आहे, असे संघटनेने पत्रात नमूद केले आहे. तपास स्वतंत्र, तांत्रिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि निष्पक्ष असावा, अशी भूमिकाही संघटनेने मांडली आहे.

बोइंग ७८७ हे ”मोअर इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट” प्रकारातील विमान आहे. पारंपरिक विमानांच्या तुलनेत त्यातील अनेक महत्त्वाच्या प्रणाली विद्युत ऊर्जेवर अवलंबून असतात. त्यामुळे विद्युत निर्मिती आणि वितरण व्यवस्था, मुख्य व स्टैंडबाय पॉवर, इंटिग्रेटेड मॉड्युलर एव्हिऑनिक्स, उड्डाण व्यवस्थापन प्रणाली, विमान नियंत्रण करणारे कम्प्युटर, डेटा नेटवर्क, बॅटरी, सेन्सर्स आणि विमानाच्या देखरेख प्रणालींची तपासणी करावी, अशी मागणी ”एफआयपी” ने केली आहे. अपघातग्रस्त विमानाच्या पूर्वीच्या देखभाल नोंदींचीही तपासणी करण्यावर संघटनेने भर दिला आहे.

यात तांत्रिक तपासणी नोंदी, देखभालीच्या नोंदी, वारंवार आढळलेले बिघाड, ट्रबलशूटिंग नोंदी, सुटे भाग किंवा घटकांची बदली, विश्वसनीयता निरीक्षण अहवाल आणि इंजिनीअरिंगच्या माध्यमातून केलेल्या दुरुस्त्यांचा समावेश आहे. बोइंग ७८७ हे जागतिक नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील अत्यंत प्रगत आणि आधुनिक विमानांपैकी एक मानले जाते. मात्र, अलिकडच्या काळातील काही घटना आणि तांत्रिक आव्हानांमुळे हे विमान जगभरात आणि भारतात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.