अश्लील व्हिडीओ प्रकरणी ‘एआयबी’ची चौकशी

विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि बिभत्सपणाचे दर्शन घडविणाऱ्या ‘एआयबी नॉक आऊट’ या कार्यक्रमाचा व्हिडीओ युटय़ुबवर अपलोड झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत.

विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि बिभत्सपणाचे दर्शन घडविणाऱ्या ‘एआयबी नॉक आऊट’ या कार्यक्रमाचा व्हिडीओ युटय़ुबवर अपलोड झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 यूटय़ूब चॅनलवर कुणीही आपले व्हिडीओ अपलोड करू शकतात. तन्मय भट, गुरसिमरन खांबा, रोहन जोशी, अबिश मॅथ्यू हे अशाच पद्धतीने यु टयुबवर चॅनलवर विनोदी व्हिडियो टाकत असतात. २० डिसेंबर रोजी वरळीत त्यांनी मुंबईत एक धर्मदाय कार्यक्रम आयोजित केला होता. एआयबी नॉकआऊट असे या कार्यक्रमाचे नाव होते. अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग या कार्यक्रमात होते तर दिग्दर्शक करण जोहर परीक्षकाच्या भूमिकेत होता. या कार्यक्रमात दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट आदी सिनेकलावंतांची उपस्थिती होती. या शो मध्ये अक्षरश अश्लील शब्दांचा भडीमार करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे तिकीट प्रत्येकी ४ हजार रुपये होते आणि त्यांना ४० लाखांचा निधी मिळाला होता.
नुकतेच या कार्यक्रमाचे तीन एपिसोड यूटय़ूब चॅनलवर अपलोड करण्यात आले.एका संघटनेने साकीनाका पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दिली. आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली असून तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसन्ना मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘आमची अजून चौकशी झालेली नाही पण आम्ही तयार आहोत’, असे एआयबीने ट्विटरवरून स्पष्ट केले.

या कार्यक्रमास परवानगी होती का, ते पडताळण्यासाठी चौकशी केली जाणार आहे.
-विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aib inquiry in porn video case