मुंबई : अचानक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तरुण वयोगटातही ही चिंताजनक बाब वेगाने वाढत असून, त्यामागे प्रामुख्याने हृदयविकार आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैली कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एम्स नवी दिल्ली येथे करण्यात आलेल्या अभ्यासात १८ ते ४५ वयोगटातील अचानक मृत्यूंच्या घटनांमध्ये हृदयविकार हा प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत करण्यात आलेल्या या अभ्यासात मे २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत शवविच्छेदनांच्या नोंदींचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, अचानक मृत्यू ठरविण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ८ टक्के प्रकरणे या निकषांत बसतात. त्यातील ५७ टक्के मृत्यू तरुणांमध्ये आढळून आले. या तरुणांचा सरासरी वय ३३.६ वर्षे असून, पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे.

अभ्यासानुसार, अचानक मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये हृदयविकार (४२.६ टक्के) अग्रस्थानी असून, त्याखालोखाल श्वसनविकार (२१.३ टक्के) आणि अस्पष्ट कारणे (२१.३ टक्के) आहेत. विशेष म्हणजे, कोविड-१९चा थेट संबंध आढळून आलेला नाही, हेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, तरुणांमध्ये धूम्रपान, मद्यसेवन, अनियमित झोप, ताणतणाव आणि बैठे जीवनमान यांसारख्या जीवनशैलीविषयक सवयी मोठा धोका ठरत आहेत. अभ्यासात तरुण मृतांपैकी ५७ टक्के धूम्रपान करणारे, तर ५२ टक्के मद्यसेवन करणारे असल्याचे निदर्शनास आले. मधुमेह व उच्च रक्तदाब हे घटक तरुणांमध्ये तुलनेने कमी असले, तरी ते वयोवृद्धांमध्ये अधिक आढळतात.

आकडेवारीनुसार, अचानक मृत्यूंपैकी ५५ टक्के घटना घरात, तर ४० टक्के घटना रात्री किंवा पहाटेच्या सुमारास घडल्याचे दिसून आले. आठवड्याच्या मध्यकाळात या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

जीवनशैलीतील बदलांबरोबरीने वाढता तणाव हे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. कामाचे अनियमित तास, वाढता ताण तसेच असुरक्षित जीवन यामुळे निर्माण होणारा तणाव झेलण्यास तरुण वर्ग कमी पडत असून त्यासाठी नियमित व्यायाम तसेच खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवण्याऐवजी धुम्रपान आणि अतिरिक्त मद्यसेवनाकडे हा तरुणवर्ग वळताना दिसतो. याचे परिणाम आरोग्यावर होणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर अपुरी झोप हेही एक मोठे कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तज्ज्ञांनी लवकर तपासणी, नियमित आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले आहे. लक्षणे नसतानाही हृदयविकाराचा धोका वाढत असल्याने, पूर्वतयारी आणि जागरूकता हाच अचानक मृत्यू टाळण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.