मागणीत किरकोळ वाढ; ऑनलाइन खरेदीचा फटका

मुंबई :  दसऱ्यापाठोपाठ आता दिवाळीचा मुहूर्तही सुनासुना गेल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणारे व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी दिवाळीत दैनंदिन विक्रीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुप्पट विक्री होते. परंतु तीन दिवसांत  मागणीत केवळ १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीनिमित्त सवलती देऊनही ग्राहकांनी पाठ फिरविल्याची खंत विक्रेते व्यक्त करीत आहेत.

दसरा आणि दिवाळीचे दोन्ही मुहूर्त खरेदीसाठी विशेष मानले जातात. परंतु यंदा दसऱ्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने ओस पडली होती. दिवाळीला ग्राहक खरेदीसाठी येतील, असा व्यापाऱ्यांना अंदाज होता. परंतु गेल्या तीन दिवसांत ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने व्यापारी चिंतेत आहेत. ‘गेल्या पंधरा दिवसांत वातानुकूलित यंत्रणेच्या मागणीत वाढ झाली होती. परंतु आता काहीशी थंडी पडू लागल्याने तीही मागणी आटली. आमच्याकडे दररोज ग्राहक येतच असतात, पण दिवाळीला त्यात मोठी वाढ होणे अपेक्षित होते. पण तसे होताना दिसत नाही. दैनंदिन मागणीच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे,’ असे विजय सेल्सचे प्रतिनिधी गिरीश मट्टा यांनी सांगितले.

ऑनलाइन खरेदीचा मोठा फटका बसल्याचा सूर र्लँमग्टन रोड येथील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांनी लावला आहे. ‘फोन, गॅझेट्स, लॅपटॉप आणि अन्य छोटी उपकरणे ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी दिवाळीत बाजारपेठ गजबजलेली असायची यंदा मात्र तसे चित्र नाही, असे  ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे सचिव निमेश दोषी यांनी सांगितले. 

सवलती अनेक

दिवाळीनिमित्ताने ग्राहकवर्ग आकर्षित व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात आल्या आहेत. विविध कंपन्यांनी वस्तूंच्या किमतीत ५ ते १० टक्के सवलत दिली आहे, तर काही कंपन्यांनी कॅशबॅक सवलत दिली आहे. दुकानदारांकडूनही मोठ्या वस्तूंवर ब्ल्यूटूथ हेडफोन, स्पिकर, गृहपयोगी उपकरणे भेट दिली जात आहेत. काही ठरावीक बँकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड असल्यास या सवलतीत अधिक वाढ मिळत आहे.