आठ डब्यांचे काम पूर्ण; मुहूर्त मात्र ऑक्टोबरचा!
चेन्नई येथील ‘इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरी’त वातानुकूलित लोकल गाडीच्या आठ डब्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र मुंबईत आल्यानंतर ही लोकल ऑक्टोबपर्यंत तरी रुळावर धावणार नसल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. वातानुकूलित लोकल एप्रिल महिन्यात मुंबईत दाखल होणार असून त्या पुढील किमान चार महिने या गाडीची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या गारेगार प्रवासाची स्वप्नपूर्ती लांबणीवर पडणार आहे.
सध्या मुंबईकरांच्या वातानुकूलित लोकल गाडीच्या बांधणीचे काम इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीत सुरू आहे. या गाडीच्या ८ डब्यांचे ८० टक्के तर ४ डब्यांचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्या पुढील काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यानंतर पहिली वातानुकूलित लोकल एप्रिल महिन्यात मुंबईकडे रवाना होईल. त्यानंतर किमान चार महिने या गाडीची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध टप्प्यातून चाचणी केली जाणार आहे.
त्यानंतर या गाडीत काही त्रुटी आढळल्यास ही गाडी पुन्हा चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीत पाठवली जाईल. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान सप्टेंबरअखेर पर्यंत ही लोकल चालवण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईकरांची वातानुकूलित लोकल निळ्या आणि राखाडी रंगात असणार आहे. तिची आसन व्यवस्था बंबार्डिअर लोकलप्रमाणे असणार आहे. खिडक्यांची रचना राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे असेल. लोकलमधील बिघाडाची पूर्वकल्पना देणारी यंत्रणाही यात बसवण्यात येणार असल्याचे समजते.