वीजेवरील १५० वातानुकूलित शिवाई बस तीन महिन्यात सेवेत?; १ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहिल्या शिवाई बसचे लोकार्पण

सुकर व पर्यावरणस्नेही प्रवास करतानाच खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळ विद्युतवर धावणाऱ्या बसगाडय़ा ताफ्यात दाखल करणार आहे.

मुंबई: सुकर व पर्यावरणस्नेही प्रवास करतानाच खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळ विद्युतवर धावणाऱ्या बसगाडय़ा ताफ्यात दाखल करणार आहे. अशा १५० बस शिवाई नावाने येत्या तीन महिन्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे. यातील पहिली बस एसटीच्या वर्धापनदिनी येत्या १ जूनला पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. पुण्यातील स्वारगेट येथे सकाळी ९.३० वाजता लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

एसटी महामंडळाने वर्षभरात भाडेतत्त्वावर एक हजार बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस विद्युतवर धावणाऱ्या असतील. वातानुकूलित तसेच साध्या प्रकारातील बसचा यात समावेश असेल. याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत विदयुतवर धावणाऱ्या १५० वातानुकूलित शिवाई बसही ऑगस्टपर्यंत दाखल करण्यात येतील. जुलै २०१९ मध्ये यसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.

आता १ जूनपासून पुणे ते अहमदनगर ते पुणे मार्गावर बस चालवण्याचे नियोजन केले असून वर्धापन दिनाचे औचित्य साधून या बस चालवण्यात येतील. प्रथम ५० शिवाई बस एका कंपनीकडून येतील. त्यानंतर आणखी १०० शिवाई बस येणार आहेत. साधारण येत्या ऑगस्टपर्यंत सर्व बस दाखल करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले

अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा

एसटी महामंडळ १ जूनला अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत असून हा सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या सोहळय़ात मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

चालकांचा गौरव

यावेळी २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत विनाअपघात सेवा बजावणाऱ्या एसटीच्या ३० चालकांचा सपत्निक गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, उस्मानाबाद, अकोला, कोल्हापूर यासह विविध विभागातील चालकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Air conditioned shivai buses electricity first shivai bus deputy chief minister ajit pawar ysh

Next Story
पालिका निवडणुकांत सरकारची कसोटी; महाविकास आघाडी सरकारला आज अडीच वर्षे पूर्ण
फोटो गॅलरी