मुंबई : विमान इंधनाच्या (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) दरांनी प्रतिकिलो लिटर दोन लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्याने देशातील विमान कंपन्यांनी हवाई प्रवासाच्या तिकीट दरांत मोठी वाढ केली आहे. देशांतर्गत प्रवासाचे भाडे २५ टक्क्यांनी तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर ११५ टक्क्यांनी महाग झाले आहे. एप्रिल-मे या ऐन सुट्टीच्या हंगामात झालेल्या या तिकीट दरवाढीमुळे यंदा प्रामुख्याने परदेशी पर्यटनाच्या प्रमाणात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम आशियातील युद्ध संघर्षाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्राला बसला आहे. दुबईसह आखाती देशांतून वाहतूक करणारी अनेक विमानसेवा युद्ध सुरू झाल्यापासून स्थगित किंवा विलंबाने सुरू आहेत. ‘फ्लाइटरडार २४’च्या आकडेवारीनुसार व्यावसायिक हवाई उड्डाणांची संख्या मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी झाली आहे. चालू महिन्यात विमान वाहतुकीत १.३ टक्क्यांची घट झाल्याचे आकडेवारी सांगते. याचा परिणाम प्रवासी संख्येवरही झाला आहे. मात्र, त्याबरोबरच विमान इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या झळा विमान वाहतूक कंपन्यांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे देशातील अनेक विमान कंपन्यांनी तिकीटदरांमध्ये इंधन अधिभार आकारण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या मुंबई-दिल्ली मार्गावरील एअर इंडियाचे भाडे ५८०० वरून ७८०० रुपयांवर पोहोचले आहे. इंडिगोच्या तिकीट दरांत ४४ टक्के वाढ होऊन ते ७५०० रुपयांवर पोहोचले आहेत. स्पाइसजेटच्या मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे भाडे नऊ हजार रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई ते बंगळुरू, दिल्ली ते पुणे या वर्दळीच्या मार्गांवरही तिकीट दरांत मोठी वाढ झाली आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यांदरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवासात आणखी मोठी दरवाढ दिसून आली आहे. मुंबई-न्यूयॉर्क विमानसेवेमध्ये एअर इंडियाच्या दरात १८० टक्के वाढ होऊन तिकीट दर २.०३ लाख रुपयांवर, तर इंडिगोचे दर १.१४ लाख रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबई – दुबई मार्गावर स्पाईसजेटने तब्बल २१२ टक्के दरवाढ नोंदवली असून, भाडे ३५,८८० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई-लंडन मार्गावर एअर इंडियाचे भाडे आता १.२८ लाख रुपये झाले आहे, तर इंडिगोच्या दरात १४२ टक्के वाढ होऊन ते १.०८ लाख रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई-बँकॉक मार्गावर एअर इंडियाचे भाडे २३,५४९ रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई-सिंगापूर मार्गावर, एअर इंडियाचे भाडे १७,८०३ रुपये असून, इंडिगोच्या दरात ४७ टक्के वाढ होऊन ते २४,७६८ रुपयांवर पोहोचले आहे.
मार्गबदलाचाही दरांवर परिणाम
आखातावरील महत्त्वपूर्ण हवाई क्षेत्र बंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. हवाई बंदीमुळे विमान कंपन्यांना प्रस्थापित मार्ग सोडून अधिक लांब आणि महागड्या वळण मार्गांने प्रवास करावा लागला. विशेषत: युरोपला आशिया आणि ऑस्ट्रेलियाशी जोडणार्या लांब पल्ल्याच्या मार्गांचा यात समावेश आहे. युरोपकडे जाणारी विमाने उत्तरेकडून कॉकसस मार्गे किंवा दक्षिणेकडे इजिप्तमार्गे नंतर सौदी आणि ओमानमार्गे न्यावी लागत आहेत. यामुळे इंधनाचा वापर आणि प्रवासाच्या वेळेत मोठी वाढ झाली.
एप्रिलमध्ये विमानसंख्येत घसरण
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच (२८ फेब्रुवारी) जागतिक विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मार्चमध्ये व्यावसायिक विमानांच्या दैनंदिन उड्डाणांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ कायम राखण्यात यश आले असले तरी, एप्रिलमध्ये विमान संख्या घसरणीला लागली आहे. मार्च महिन्यातील कामगिरीनंतर एप्रिलमधील व्यावसायिक उड्डाणांची संख्या २०२५ च्या सरासरी विमान संख्येपेक्षा कमी आहे. या महिन्यातील काही दिवसांमध्ये ही संख्या २०२४ मधील विमान संख्येपेक्षाही कमी आहे. ६ ते १३ एप्रिल या कालावधीतील व्यावसायिक कामकाजाची सात-दिवसीय मूव्हिंग ॲव्हरेज ही मागील वर्षीच्या याच कालावधीतील सात-दिवसीय मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा कमी आहे.
आगाऊ नोंदणीचा फायदा
वाढलेल्या तिकीट दरांचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, पर्यटन सहलींचे आगाऊ नियोजन करून तिकीट नोंदणी करणार्या प्रवाशांना या दरवाढीची झळ बसणार नाही.
एका विमानामागे १५० ते २०० कर्मचारी काम करत असतात. त्यात वैमानिक, हवाईसेविकांसह इतर कर्मचार्यांचा समावेश असतो. सर्व कर्मचार्यांचा पगार, इंधन खर्च आणि इतर खर्च असतात. इराण – अमेरिका संघर्षमुळे विमान संख्या निम्मी झाली आहें. त्यातच मार्ग कधीही बदलावे लागतात. त्यामुळे खर्च वाढला आहे. परिणामी तिकीट दर वाढले आहेत. – कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी वैमानिक (जेट एअरवेज)
