मुंबई: विमान इंधनाच्या (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) दरात प्रति किलोलीटर २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्याने, देशभरात विमान भाड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत भाडेवाढ २५ टक्के पर्यंत मर्यादित असली तरी, आंतरराष्ट्रीय मार्गांवर ११५ टक्यां पर्यंत वाढ झाली आहे. प्रमुख मार्गांवर तिकिटांच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, काही आंतरराष्ट्रीय भाड्यांमध्ये २०० टक्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत देशी आणि परदेशी पर्यटनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिल महिन्यासाठी विमान इंधनाच्या नव्या दरांची घोषणा केली आहे, त्यात तब्बल ११५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचा दर प्रति किलोलीटर ₹२ लाखांच्या पुढे गेला आहे. भारत सरकारने अनुसूचित देशांतर्गत विमानसेवांसाठी दरवाढ २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवली असली तरी, आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये तब्बल ११५ टक्क्यांची वाढ दिसून आली. याचा परिणाम आता प्रत्येक प्रमुख मार्गावर तिकीट दरांवर दिसून येत आहे.

देशांतर्गत तिकिट दरांची तुलना

मुंबई-दिल्ली मार्गावर, एअर इंडियाचे भाडे ५,८०० वरून `७,८०० पर्यंत वाढले आहे, म्हणजेच ३४ टक्के वाढ झाली आहे. इंडिगोच्या दरात ४४ टक्के वाढ होऊन ते `७,५०० झाले आहे, तर स्पाईसजेटच्या दरात ८०टक्यांची लक्षणीय वाढ होऊन ते ९ हजारांच्या घऱात पोहोचले आहे. मुंबई आणि बंगळूरु दरम्यान, एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाईसजेटचे दर अनुक्रमे ५,७७२,५,५१५ आणि ५,७०६ पर्यत वाढले आहेत. दिल्ली-पुणे मार्गावर, स्पाईसजेटने सर्वाधिक ५९ टक्के दरवाढ नोंदवली असून, भाडे `७,११९ झाले आहे.

आंतरराष्ट्रीय मार्गावर दरवाढ

मार्च आणि एप्रिल महिन्यांदरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवासात आणखी मोठी दरवाढ दिसून आली आहे. मुंबई-न्यूयॉर्क विमानसेवेमध्ये एअर इंडियाच्या दरात १८० टक्के वाढ होऊन तिकिट २.०३ लाख रुपयांवर तर इंडिगोचे दर १.१४ लाख रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई ते दुबई मार्गावर, स्पाईसजेटने तब्बल २१२ टक्के दरवाढ नोंदवली असून, भाडे ३५,८८० रुपयांवर पोहोचले आहे.

मुंबई-लंडन मार्गावर, एअर इंडियाचे भाडे आता १.२८ लाख रुपये झाले आहे, तर इंडिगोच्या दरात १४२ टक्के वाढ होऊन ते १.०८ लाख रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई-बँकॉक मार्गावर एअर इंडियाचे भाडे २३,५४९ रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई-सिंगापूर मार्गावर, एअर इंडियाचे भाडे १७,८०३ रुपये असून, इंडिगोच्या दरात ४७ टक्के वाढ होऊन ते २४,७६८ रुपयांवर पोहोचले आहे.

एका विमानामागे 150 ते 200 कर्मचारी काम करत असतात. त्यात वैमानिक, हवाई सुंदरीसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.सर्व कर्मचाऱ्यांचा पगार, इंधन खर्च आणि इतर खर्च असतात. इराण – अमेरिका संघर्षमूळे विमान संख्या निम्मी झाली आहें. त्यातच मार्ग कधीही बदलावे लागतात. त्यामुळे खर्च वाढला आहें. परिणामी तिकीट दर वाढले आहेत. कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी वैमानिक ( जेट एअरवेज)