मुंबई : समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे वातावरणातील धूळ, धूर आणि धुक्याचे मिश्रण म्हणजेच धुरक्याचे प्रमाण वाढले असून हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे दिल्लीसारखी मुंबईच्या हवेची अवस्था झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०९ असा नोंदवण्यात आला असून राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांनुसार (एनएएक्यूएस) हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ असल्याचे सूचक आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोव्हेंबरअखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला तापमानात कमालीचा बदल झाला. सध्या किमान आणि कमाल तापमान वाढले असले तरी समुद्री वाऱ्याची गती कमी असल्याने धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. ही परिस्थिती गेल्या तीन दिवसांपासून असल्याने मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील तीन दिवसांच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ पातळीवर असल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील सुमारे सहा केंद्रांवर प्रति घनमीटरमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पी.एम. २.५) ३०० पेक्षाही अधिक असल्याची नोंद मंगळवारी झाली. माझगाव येथे हवेचा दर्जा सर्वात खालावलेला (३८५ एक्यूआय) असल्याचे नोंदवण्यात आले. सध्या दिल्लीमधील हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३२९ असून हे प्रमाण मुंबईच्या तुलनेने २० ने कमी आहे.

उन्हाळा आणि पावसाळय़ाच्या तुलनेत हिवाळय़ात धूलिकणांचे प्रमाण वाढते. या हंगामात वाऱ्याची गती मंदावल्याने धूलिकणांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होत नाही. एकाच ठिकाणी धूलिकण कोंडल्याने प्रदूषकांचे प्रमाण वाढते. साधारण जानेवारीपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मुखपट्टी बांधून घराबाहेर पडावे. तसेच सकाळ आणि सायंकाळी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत

– सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी

मंगळवारी नोंद करण्यात आलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक

माझगाव           ३८५

चेंबूर             ३४७

वांद्रे-कुर्ला संकुल     ३२८ 

मालाड                ३२२

कुलाबा            ३०५ 

भांडुप             ३००

अंधेरी             २२८ 

बोरिवली           २०८ 

वरळी              २०१

नवी मुंबई         १६६

(वातावरणातील कणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटरमध्ये, स्रोत : सफर)

More Stories onमुंबईMumbai
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air in mumbai extremely bad increase in ultra fine particles mumbai news ysh
First published on: 07-12-2022 at 01:33 IST