मुंबई : गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असून समीर अ‍ॅपच्या नोंदीनुसार बुधवारी शिवाजीनगरमध्ये वाईट हवेची नोंद झाली. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक २७२ इतका होता.

समीर अ‍ॅपच्या नोंदीनुसार बुधवारी संपूर्ण मुंबईच्या हवेचा विचार केला असता फक्त शिवाजीनगरमधीलच हवा वाईट होती. शिवाजीनगर परिसरात होत असलेल्या वायूप्रदूषणामुळे सकाळी धुरके पसरलेले असते. पहाटे बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवतो. तसेच परिसरात रासायने, धूर यांचा दर्प असतो. त्यामुळेही श्वास घेण्यास त्रास होत आहे. या परिसरात हवेत मोठ्या प्रमाणात धूळ साचल्यामुळे गेले अनेक दिवस दृश्यमानताही कमी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी शिवाजीनगर येथे वाईट हवेची नोंद झाली.

हेही वाचा – बीडीडी चाळ पुनर्विकास : वरळीतील ५५० घरांचा ताबा मार्चमध्ये, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात घरांच्या वितरणाचा समावेश

मागील दोन महिन्यांपासून मुंबईतील खालावलेली हवा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर उपयायोजना लागू केल्या आहेत. त्यानंतर मुंबईतील काही भागातील हवेत सुधारणा झाली आहे. मात्र, शिवाजीनगर येथील हवा गेल्या दोन महिन्यांपासून ढासळलेली असताना देखील तिथे कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. दरम्यान, शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण या परिसरात अधिक आहे. राडारोड्याची अवैध वाहतूक, तसेच कचराभूमीमधील कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे सतत प्रदूषण वाढत आहे. यापूर्वीही अनेकदा शिवाजीनगरमधील हवेची वाईट ते अतिवाईट श्रेणीत नोंद झाली होती. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील स्थानिकांना आरोग्य समास्यांना सामोरे जावे लागते आहे.

हेही वाचा – मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी

मॉनिटरिंग व्हॅनची नजर

शिवाजीनगरमधील धोकादायक हवा ही एक गंभीर समस्या असून त्यासाठी शिवाजीनगर परिसरात सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मॉनिटरिंग व्हॅन ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात कोणत्या वेळी हवा अधिक प्रदूषित असते. कोणत्या धूलीकणांचे प्रमाण अधिक असते. हे कळण्यास मदत होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तसेच परिसरातील हवा निर्देशांक २०० पेक्षा अधिक असेल तर तेथील बांधकामांवर निर्बंध लादले जातील. तसेच तेथे कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची असेल असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader