मुंबई : एअर इंडिया आणि अदानी एअरपोर्ट्सने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ऑनलाइन ड्युटी-फ्री शॉपिंगची सेवा सुरू केली आहे. प्रवासी एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून प्रवासापूर्वी ड्युटी-फ्री उत्पादने ऑनलाइन पाहू शकतात, प्री-ऑर्डर करू शकतात आणि पैसे भरू शकतात. खरेदी केलेले सामान विमानतळावरील निर्धारित ड्युटी-फ्री काउंटरवरून सहज उपलब्ध होते. या नवीन सेवेवर प्रवाशांना सुरुवातीला २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. प्रत्येक १०० रुपयांच्या खरेदीवर ३ महाराजा पॉईंट्स प्रवाशांना मिळणार आहेत.

प्रवासी प्रीमियम सौदर्यप्रसाधने आणि सुगंधी द्रव्ये, लक्झरी वस्तूंचा समावेश असलेल्या विस्तृत डिजिटल कॅटलॉगमधून निवड करू शकतात. यामध्ये चॉकलेट आणि कन्फेक्शनरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि जागतिक दर्जाच्या स्पिरिट्सचा समावेश आहे. अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, मंगळुरू, मुंबई, नवी मुंबई आणि तिरुवनंतपुरम येथे डयूटी-फ्री हब असलेल्या प्रमुख विमानतळांवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारावर (इंटरनॅशनल गेटवे) नियोजित रोलआउट्ससह उपलब्ध आहे. विविध श्रेणींमधील ऑनलाइन विशेष ऑफर्सचा लाभही प्रवासी घेऊ शकतात.

ऑनलाइन प्री-ऑर्डरवर अतिरिक्त सवलती

या सुविधेमुळे विमानतळावरील खरेदीची गर्दी आणि ब्राउझिंगचा वेळ कमी होईल. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊ शकते. प्रवाशांना विमानतळावर रांगेत उभे राहून खरेदी करण्याची गरज पडत नाही. तुम्ही प्रवासापूर्वी घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर्स बुक करू शकता. तसेच प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाइन खरेदी केल्यास लॉयल्टी पॉइंट्स किंवा रिवॉर्ड्स मिळतात, ज्यांचा फायदा भविष्यातील प्रवासात होतो. ड्युटी-फ्री वस्तूंवर स्थानिक आयात शुल्क आणि कर आकारले जात नाहीत. तसेच ऑनलाइन प्री-ऑर्डरवर अतिरिक्त सवलती आणि बँक ऑफर्स मिळतात.

या विमानतळांवर सुविधा

अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, मंगळुरू, मुंबई, नवी मुंबई आणि तिरुवनंतपुरम