मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीतही एअर इंडिया युरोप आणि अमेरिकेसाठी अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहे. १० ते १८ मार्चदरम्यान ९ मार्गांवर ७८ अतिरिक्त विमान सेवा चालविण्यात येणार आहे. न्यू यॉर्क, लंडन, फ्रँकफर्ट, ॲमस्टरडॅम, झुरिच, पॅरिस, कोलंबो, माले या मार्गावर विमान सेवा देणार आहे.
पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांची घरी परतण्यासाठी विमान प्रवासाची जास्त मागणी आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार एअर इंडियाने युरोपमधील पाच प्रमुख देशांत तसेच न्यू यॉर्क (जेएफके) १ येथे अतिरिक्त विमान सेवा चालविण्याचा निर्णय़ घेतला आहे. १० ते १८ मार्चदरम्यान, एअर इंडिया नऊ मार्गांवर ७८ अतिरिक्त विमाने चालविणार आहे.
या उड्डाणांमुळे दोन्ही दिशांना नऊ मार्गांवर १७ हजार ६६० आसन क्षमता वाढणार आहे . युरोपियन मार्गांवरील अतिरिक्त उड्डाणे बी ७८७-८ ने चालवली जाणार आहेत. माले आणि कोलंबोला ए ३२० एनईओ विमानांची सेवा असणार आहे. न्यू यॉर्क (जेएफके) एअर इंडियाच्या बी ७७७ – ३०० ईआर विमानाचे उड्डाण होणार आहे.
नऊ मार्गावर विमान सेवा
दिल्ली ते न्यू यॉर्क (जेएफके) १, लंडन (हीथ्रो), फ्रँकफर्ट, पॅरिस (सीडीजी), ॲमस्टरडॅम, झ्युरिच, माले, कोलंबो आणि मुंबई ते लंडन (हीथ्रो).
अडचणी असूनही, एअर इंडिया युरोप आणि उत्तर अमेरिकेसाठी त्यांच्या नियोजित सेवा सुरू ठेवत आहे, वाहतूकीसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पर्यायी मार्गांचा वापर करून अनेक आंतरराष्ट्रीय मार्गावरील जोडणी (कनेक्टिव्हिटी) कायम ठेवत आहे. – निपुण अग्रवाल, मुख्य व्यावसायिक अधिकारी, एअर इंडिया.
