मुंबई: एअर इंडियाच्या ‘एआय-१७१’ विमानाच्या अपघातानंतर, अमेरिकेतील ‘फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी’ (एफएएस) या संस्थेने भारताच्या ”एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो”वर (एएआयबी) महत्त्वपूर्ण देखभाल नोंदी लपवल्याचा, उड्डाणांची प्रत्यक्षातील माहिती न दिल्याचा व संभाव्य धोक्यांविषयी जागतिक विमान वाहतूक विभागाला सावध करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

शिवाय, एफएएसने चौकशीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एफएएसचे कार्यकारी संचालक एड पिअरसन यांनी, एएआयबीच्या पारदर्शकतेत सततचा अभाव व आंतरराष्ट्रीय अपघात तपास मानकांचे पालन करण्यात आलेले उघड अपयश यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पिअरसन यांनी २७ ऑगस्ट रोजी एएआयबीचे संचालक जी. व्ही. जी. युगांधर यांना लिहिलेल्या पत्रानुसार, फाऊंडेशनने ही कागदपत्रे इंग्लंडमधील एएआयबीच्या एका तज्ज्ञामार्फत भारतीय अधिकाऱ्यांकडे पाठवली होती.

या कागदपत्रांमध्ये विमानांच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक व फ्लाइट कॉम्प्युटर सिस्टीममधील प्रणालीत दीर्घकालीन बिघाड असल्याचा दावा केला होता. पिअरसन यांच्या पाठपुरावा पत्राच्या एक दिवस आधी एएआयबीने दिलेल्या प्रतिसादाचाही उल्लेख आहे. दरम्यान, एफएएसने दिलेली तांत्रिक माहिती १० जून रोजी इंग्लंडमधील एएआयबीच्या तज्ज्ञामार्फत मिळाली होती व तपासादरम्यान तपास पथकाकडून तिची तपासणी केली जात आहे, अशी पुष्टी महासंचालकांनी त्यात केली होती.

विदा (डेटा) उघड करण्यासंबंधीचे आरोप

पिअरसन यांनी दावा केला आहे की, अपघातातील संभाव्य कारणे ओळखण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. एएआयबीवर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या परिशिष्ट १३, कलम ५ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपास अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित माहिती गोळा करणे, नोंदवणे व विश्लेषण करणे अनिवार्य आहे. त्यांनी असेही नमूद केले की, एएआयबीने आपल्या प्राथमिक वा अंतरिम अहवालांमध्ये या कागदपत्रांची माहिती दिलेली नाही. तसेच एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स ॲड्रेसिंग अँड रिपोर्टिंग सिस्टीम व एअरक्राफ्ट हेल्थ मॅनेजमेंट डेटा स्ट्रीम्स वगळले आहेत. डेटा स्ट्रीम्स विशिष्ट सिस्टीम बिघाडाच्या घटनांचा तपशील देतात व आपत्तीपूर्वी झालेल्या दोषांची नेमकी वेळ निश्चित करतात, असा दावा पिअरसन यांनी केला आहे.

अधिक पारदर्शकतेची मागणी

महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावे गोपनीय ठेवूनही, सार्वजनिकरित्या वैमानिकाची चूक असल्याचे मानल्याबद्दल पिअरसन यांनी तपास अधिकाऱ्यांवर टीका केली. एनटीएसबीसारख्या तपास यंत्रणा अनेकदा तर्कवितर्क न लावता तपास चालू देण्यास सांगतात. पण तर्कवितर्क हा शत्रू नाही; माहिती लपविणे हे चुकीचे आहे, असे सांगत सादर केलेली कागदपत्रे तात्काळ सार्वजनिक नोंदींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी पिअरसन यांनी केली.