मुंबई : गेल्या काही वर्षापासून प्रवासी सेवेत नसलेल्या ३० विमानांपैकी शेवटचे बोईंग ७७७-३०० ईआर-व्हीटी-ऑल आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे. पुढील टप्प्यात वर्ष २०२७ पासून व्हीटी-ऑल आणि एअर इंडियाच्या ताफ्यातील बी-७७७ विमानांचे नूतनीकरण केले जाणार आहे. या नूतनीकरणानंतर आरामदायी आसने आणि आधुनिक सुविधांसह हे विमान नविन ढंगात प्रवासी सेवेत येणार आहे.
वर्ष २०२२ मध्ये एअर इंडिया टाटा समूहाकडे परत आली, तेव्हा विमानांच्या ताफ्याची पुनर्रचना करणे आणि जागतिक दर्जाची परिचालन क्षमता पुन्हा प्रस्थापित करणे हे विमान कंपनीची प्राथमिकता होती. वारसा हक्काने मिळालेल्या ११३ विमानांच्या ताफ्यात ३० वाइडबॉडी आणि नॅरोबॉडी विमाने होती. ही विमाने अनेक वर्षांपासून जमिनीवरच पडून होती. खाजगीकरणानंतर, एअर इंडियाने या विमानांना पुनरुज्जीवित करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला. जमिनीवर पडून असलेल्या ३० विमानांपैकी शेवटचे, बोईंग ७७७-३००ईआर, व्हीटी-ऑल प्रवासी सेवेत पुन्हा आले आहे.
सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचे पुनरागमन
विमानाचे अनेक भाग नादुरुस्त झाल्याने आणि सुटे भाग जुने झाल्यामुळे व्हीटी-ऑल विमान फेब्रुवारी २०२० पासून जमिनीवर उभे केले होते. एप्रिल २०२५ मध्ये, एअर इंडियाने लांब पल्ल्याच्या उड्डाणांच्या विस्ताराला पाठिंबा देण्यासाठी ते पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्याचे प्रयत्न सुरू केले. मे २०२५ मध्ये, हे विमान AIESL नागपूर येथील MRO सुविधेत दाखल झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण पुनर्बांधणीला सुरुवात झाली.
पुर्नबांधणीत काय
तीन हजारांहून अधिक नवीन महत्त्वाचे भाग बसविले. चार हजारांहून अधिक देखभालीची कामे पूर्ण केली. यात जटिल लॉंगेरॉन मॉडिफिकेशनसारख्या ८० अनिवार्य सुधारणांचा समावेश होता. इंजिन, एपीयू, इनलेट व फॅन काउल्स आणि थ्रस्ट रिव्हर्सर काउल्स यांसारखे प्रमुख भाग बदलले. वातानुकूलित यंत्रणा, लँडिंग गिअर, हायड्रॉलिक्स, ऑक्सिजन, एव्हियोनिक्स आणि इंजिन प्रणालीची पुर्नरचना केली. बोईंगच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली, प्रत्येक भागाची बदली, प्रणालीची पुनर्स्थापना आणि संरचनात्मक दुरुस्ती नागरी हवाई वाहतुक महासंचालनालयाद्वारे (डीजीसीए)कठोर चाचणी, दस्तऐवजीकरण आणि नियामक देखरेखीखाली पार पडली.
अभियांत्रिकी विजय
एअर इंडियाच्या बेस मेंटेनन्स, नियोजन, तांत्रिक सेवा, खरेदी आणि पुरवठा साखळी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस पॉवरप्लांट, कंटिन्यूइंग एअरवर्थिनेस मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन आणि गुणवत्ता हमी पथकांमधील अखंड समन्वयामुळे बोईंग ७७७-३००ईआर, व्हीटी-ऑल विमानांचे पुनरुज्जीवन शक्य झाले. विमानाची ‘चाचणी उड्डाण’ यशस्वीरित्या पूर्ण झाली. एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट देखील दिले आहे .
