मुंबई : सरकारच्या विविध विभागांच्या कार्यालयासाठी आता नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची २२ मजली इमारत उपलब्ध झाली आहे. इमारत ताब्यात घेतल्यानंतर या इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्यात आली असून आता या इमारतीला नवी झळाळी दिली जाणार आहे. या नूतनीकरणासाठी १८१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.
एअर इंडिया इमारत राज्य सरकारने नुकतीच १ हजार ६०१ कोटी रुपये मोजून खरेदी केली. इमारतीची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन इमारत ताब्यात आल्यानंतर सरकारने इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती, नूतनीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली आहे. त्यासाठी विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळून वित्त विभागाने निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे यांनी दिली.
एअर इंडिया इमारतीसाठी स्थापत्य आणि विद्युतीकरण अशा दोन स्वतंत्र निविदा काढण्यात येतील. निविदा काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून इमारत नूतनीकरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. स्थापत्य कामात इमारतीची दुरुस्ती, सजावट, नवे फर्निचर आणि रंगरगोटीचा समावेश आहे. तर विद्युतीकरणात नव्या लिफ्ट, विद्युत उपकरणे बसवणे यांचा समावेश असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले.
एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावरील वास्तुविशारदाची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे. इमारतीत बसविण्यात येणारी विद्युत उपकरणे अत्युच्च दर्जाची आणि नामांकित कंपन्यांची असतील. विद्युत उपकरणाची देखभाल दुरुस्ती किमान पाच वर्ष मूळ निर्माता कंपनीकडून करून घ्यावी. दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाचा दोषदायित्व कालावधी किमान पाच वर्षांचा असावा, असे यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे.
एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणासाठीचा खर्च
मजबुतीकरण, दुरुस्ती आणि नूतनीकरण ……७५ कोटी ३२ लाख ५७ हजार रुपये
संपूर्ण विद्युतीकरण……७० कोटी ९२ लाख २३ हजार रुपये
वास्तुविशारद, सल्लागार शुल्क, जीएसटी…..३४ कोटी ७६ लाख ३१ हजार रुपये
