मुंबई : एअर इंडिया येत्या १५ मेपासून दिल्ली-हलवारा (लुधियाना) दरम्यान विमान सुरू करणार आहे. लुधियानाकरिता विमान सेवा सुरू करणारी एअर इंडिया पहिली विमान कंपनी ठरली आहे. यामुळे पंजाबच्या औद्योगिक केंद्रामधून दिल्ली आणि इतर राज्यासह आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एअर इंडिया ए३२० फॅमिली विमानांच्या आधारे दिल्ली – हलवारा दरम्यान दररोज दोन उड्डाणे चालवणार आहे. दिल्लीमार्गे युनायटेड किंगडम आणि उर्वरित युरोपमधील ठिकाणांसह इतर ठिकाणी त्याच दिवशी कनेक्टिव्हिटी मिळेल,अशा पद्धतीने या विमानांच्या उड्डाणांचे वेळापत्रक तयार केले आहे. या विमान सेवेमुळे हलवारा/लुधियाना आणि आसपासच्या भागांतील प्रवासी एअर इंडियाने सोयीस्करपणे दिल्लीला प्रवास करू शकतात.
तसेच त्याच टर्मिनलमधून एकाच तिकिटावर लंडन, बर्मिंगहॅम, रोम, मिलान आणि पॅरिससारख्या ठिकाणांसाठी पुढील प्रवास करू शकतात. या विमान सेवेमुळे लुधियाना आणि आसपासच्या शहरांमधील नागरिकांना दिल्लीमार्गे आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची सोय होणार असल्याचे एअर इंडियाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी निपुण अग्रवाल यांनी सांगितले.
