मुंबई : भारतीय विमान कंपन्यांनी मार्च महिन्यात तीन हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण १३ टक्यांनी जास्त आहे. यात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सर्वाधिक १ हजार २१५ विमानांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच विमान कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

इराण – अमेरिका, इस्रायल संघर्षामुळे देशातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या इंडिगो आणि एअर इंडिया समूहाने मार्च महिन्यात एकूण १६ हजार आंतरराष्ट्रीय फेऱ्यांपैकी सुमारे ३ हजार २५ उड्डाणे रद्द केली. स्पाईसजेटने आपल्या ५५ टक्क्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. इंडिगोने मार्चमध्ये नियोजित असलेल्या ७ हजार ४३२ आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे १० टक्के, तर एअर इंडियाने १३ टक्के उड्डाणे रद्द केली. फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण केवळ दोन टक्के होते.

आखाती युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यापासून भारतीय विमान कंपन्यांनी १० हजारांहून अधिक उड्डाणे रद्द केली. भारतीय विमान कंपन्यांना युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना लांबचे मार्ग घ्यावे लागल्याने प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मार्च महिन्यात रद्द केलेल्या तीन हजार विमानांमुळे सुमारे ३ लाख १० हजारांहून अधिक आसन क्षमतेत कपात झाली.

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर इंडिया, इंडिगोने जॉर्जिया, कझाकिस्तान, अझरबैजान, उझबेकिस्तान आणि युरोपमधील प्रमुख शहरांसाठीच्या उड्डाणांमध्ये मोठी कपात केली. इराणच्या हवाई क्षेत्रातील तणावामुळे लांबचा वळसा घ्यावा लागत असल्याने विमान कंपन्यांना परिचालन खर्चात वाढ झाल्याने हे निर्णय घ्यावे लागले. विमान कंपन्याचा ४० टक्के खर्च इंधनावर होतो. इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील तिकिट दरात देखील वाढ झाली आहे.