मुंबई : तोटा कमी करण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे एअर इंडिया कंपनीत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर असून याकरिता संचालक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. दरम्यान, विलीनीकरणानंतरही ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ हे नाव कायम राहण्याची शक्यता आहे.
एअर इंडियाला सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून टेवोल्डे गेब्रेमारियम यांची ५ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्ती झाली. गेब्रेमारियम हे यापूर्वी इथिओपियन विमान कंपनी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी दहा वर्षांत इथिओपियन विमान कंपनीला आफ्रिकेतील सर्वात मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी विमान कंपनी म्हणून नावलौकिक मिळवून दिला. नियुक्तीनंतर त्यांनी विमान कंपनीच्या विविध विभागांशी चर्चा केली. दोन्ही कंपन्या एकाच संरचनेखाली आल्या, तर खर्च कमी होऊ शकतो, असा विचार आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसला एकत्र करण्याची योजना प्राथमिक टप्प्यात आहे.
आव्हाने कोणती?
* भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंद असणे.
* पश्चिम आशियातील संघर्षांचा हवाई वाहतुकीवर झालेला परिणाम.
* इंधनाच्या वाढत्या किमती.
* मालवाहतूक क्षमतेचा अधिक चांगला वापर.
* एअर इंडियामधील खर्च कमी करणे. विमानांची संख्या वाढवणे.
