मुंबई : फुकेत-दिल्ली विमान निर्धारित उड्डाण उंचीवरून अचानक ३०० फूट खाली आल्याच्या घटनेची एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर झालेल्या चाचणीत (कन्फर्मेटरी टेस्ट) मुख्य वैमानिकाची अमली पदार्थविषयक निष्कर्ष (सायकोएक्टिव्ह सबस्टन्स) पॉझिटिव्ह आले. त्या पार्श्वभूमीवर, दोन्ही कंपन्यांनी कार्यरत सर्व वैमानिकांची अमली पदार्थविषयक चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या या दोन्ही विमान कंपन्यांमध्ये सुमार ५ हजारांहून अधिक वैमानिक आहेत.
४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत विमान अचानक खाली आल्याने प्रवाशांना धक्के बसले व काही जण जखमी झाले होते. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर केलेल्या प्राथमिक व त्यानंतरच्या प्रयोगशाळेतील चाचणीत मुख्य वैमानिक गांजाच्या (मारिजुआना) नशेत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) व विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) सखोल चौकशी सुरू केली आहे. या गंभीर प्रकरणानंतर एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसने आपल्या ५ हजारांहून अधिक वैमानिकांची अमली पदार्थविषयक चाचणी अनिवार्य केली आहे. ही चाचणी गुरुग्राम अकादमीमधील प्रशिक्षणादरम्यान, उड्डाणानंतर फ्लाइट ब्रीफिंग सेंटर्समध्ये, विमान कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये वा संबंधित तळांनी दिलेल्या ठिकाणी एकाच वेळी घेतली जाईल.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान कंपन्यांनी नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोर केली आहे. ही चाचणी अनिवार्य असून ती घेण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. वैमानिकांना पाठवलेल्या एका संदेशात, दोन्ही विमान कंपन्यांनी प्रचलित नियमांनुसार परवानगी नसलेल्या कोणत्याही पदार्थांची वा औषधांची संपूर्ण तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दररोज १,००० उड्डाणे एअर इंडिया कंपनी दररोज अंदाजे १,००० ते १,१०० उड्डाणे करते. एअर इंडिया एक्स्प्रेस ही कमी खर्चाची (लो-कॉस्ट) विमान कंपनी दररोज ५००हून अधिक (वा मागणीनुसार सरासरी ४२० ते ५०० दरम्यान) उड्डाणे चालवते. दोन्ही विमान कंपन्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय (मध्य पूर्व, आशियाई देश इ.) मार्गांवर विमानांची सेवा पुरवतात.
