मुंबई : एअर इंडिया एक्स्प्रेसने २५ ऑक्टोबरपासून लागू होणारे आतापर्यंतचे सर्वात मोठे हिवाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसची २५ ऑक्टोबरपासून दररोज सुमारे ५८५ उड्डाणे होणार आहेत. सध्याच्या उन्हाळी वेळापत्रकाच्या तुलनेत यात १७ टक्के वाढ हिवाळी वेळापत्रकात केली आहे. यामध्ये दररोज साधारण ४३५ देशांतर्गत आणि १५० आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. या वेळापत्रकात ४० हून अधिक नवीन मार्ग जोडले जाणार आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसचे हिवाळी वेळापत्रक २५ ऑक्टोबर २०२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहे. उन्हाळी २०२६ च्या वेळापत्रकानुसार साप्ताहिक उड्डाणांची संख्या सुमारे ३,१५० वरून हिवाळी २०२६ मध्ये जवळपास ४,१०० पर्यंत वाढणार आहे. एक थांबा असलेली विमानसेवा देखील अंदाजे १,३३० साप्ताहिक उड्डाणांवरून १,६०० पर्यंत वाढणार आहे. हिवाळी वेळापत्रकानुसार एअर इंडिया एक्सप्रेस भारतीय शहरांमधून अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणार आहे. नवीन सेवांमध्ये बंगळूरु-काठमांडूसाठी दररोजची विमानसेवा आणि चेन्नई-सिंगापूरसाठी दिवसातून दोनदा होणारी विमानसेवा समाविष्ट आहे.

दिल्लीहून रियाधसाठी आठवड्यातून चार विमानसेवा सुरू होतील, तर लखनौहून रियाधला आठवड्यातून तीनदा आणि रास अल खैमाहला आठवड्यातून चारदा विमानसेवा जोडली जाईल. इंदूर आणि कोचीहून आठवड्यातून चार वेळा आणि विशाखापट्टणमहून आठवड्यातून दोन वेळा बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. हैदराबादहून फुकेतसाठी आठवड्यातून चार विमानसेवा उपलब्ध होतील. इतर जोडण्यांमध्ये अबू धाबी-गोवा (मोपा), अमृतसर-अबू धाबी, बहरीन-तिरुवनंतपुरम, भोपाळ-शारजा, चंडीगढ-शारजाह, दुबई-गोवा (दाबोलिम), कोची-कुवैत, मंगळुरु-कुवैत, मंगळुरु-रस अल-खैम्याह, मुंबई-रास अल-खैमताह, आणि शारजाह-सुरत मार्गाचा समावेश आहे.

देशांतर्गत नेटवर्कवर नवीन कनेक्शन्स

देशांतर्गत नेटवर्कवर, एअर इंडिया एक्सप्रेस बंगळूरु-कोयंबतूर विमानसेवा दिवसातून दोनदा आणि बंगळूरुला गोवा (मोपा), जोधपूर व मदुराईशी जोडणारी दैनंदिन विमानसेवा सुरू करणार आहे. दिल्लीहून अहमदाबाद, श्री विजयपुरम (पोर्ट ब्लेअर) आणि उदयपूरसाठी दररोज विमानसेवा सुरू होईल, तसेच जयपूरसाठी आठवड्यातून पाच विमानसेवा उपलब्ध होतील.इतर नवीन मार्गांमध्ये भुवनेश्वर-श्री विजयपुरम, भोपाळ-नवी मुंबई, हैदराबाद-मंगळूर, हैदराबाद-पुणे, इंदूर-नवी मुंबई, कोलकाता-पुणे आणि मुंबई-नागपूर यांचा समावेश आहे.

व्यापार, पर्यटन व आर्थिक विकासाला चालना

हिवाळी वेळापत्रकाची व्याप्ती व्यापार, पर्यटन व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हवाई संपर्काचे वाढते महत्त्व, या दोन्ही गोष्टी दर्शवते. एअर इंडिया एक्सप्रेस महानगरे, उदयोन्मुख शहरे आणि अपुऱ्या सेवा असलेल्या बाजारपेठांमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करून प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि आरामदायक बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.- निपुण अग्रवाल, अध्यक्ष, एअर इंडिया एक्सप्रेस.