मुंबई : प्रमुख परिवर्तन कार्यक्रमांतर्गत एअर इंडियाला पहिले नूतनीकरण केलेले बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान मिळाले असून एअरलाइनच्या २६ वाइडबॉडी विमानांसाठीच्या ४०० दशलक्ष डॉलर्सच्या नूतनीकरण कार्यक्रमाचा एक भाग आहे. व्हीटी-एएनटी म्हणून नोंदणीकृत असलेले हे विमान, एअरलाइनचे पहिले वाइडबॉडी विमान होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये ते कॅलिफोर्नियाच्या व्हिक्टरव्हिल बोईंगच्या कारखान्यात पाठवले होते. सॅन बर्नार्डिनो येथे रंगकाम झाल्यानंतर, हे विमान सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावर उतरले.
एअर इंडियाचे माजी सीईओ कॅम्पबेल विल्सन यांच्या महत्त्वाकांक्षी ‘विहान एआय’ परिवर्तन प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा म्हणून, विमानाच्या आतील भागाचा संपूर्ण कायापालट करण्यात आला. एकेकाळी जुनाट अंतर्गत सजावट आणि सदोष इनफ्लाइट मनोरंजन प्रणालीबद्दल टीका झालेल्या जुन्या बोईंग ७८७-८ विमानांच्या ताफ्याची, इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस या आधुनिक तीन-श्रेणी संरचनेत पूर्णपणे पुनर्रचना केली आहे. ही नवीन अंतर्गत सजावट, त्याच वेळी ताफ्यात सामील होणाऱ्या लाइन-फिट (फॅक्टरी-फ्रेश) बोईंग ७८७-९ आणि एअरबस ए ३५०-१००० विमानांशी जुळेल अशा प्रकारे डिझाइन केले आहे.
१३ जुन्या विमानांचे लवकरच नूतनीकरण
एअर इंडिया २६ जुन्या बी ७८७ – ८ विमानांपैकी सुमारे सात विमानांची व्हिक्टरव्हिल येथे मोठी, नियोजित देखभाल केली जाणार आहे. एअरलाइनने आपल्या १३ जुन्या बोईंग ७७७-३०० ईआर विमानांचे नूतनीकरण २०२७ च्या सुरुवातीला सुरू करण्याची योजना आखली असून, ते ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
ड्रीमलाइनर विमाने प्रवासी सेवेत
अत्याधुनिक ड्रीमलाइनर विमान यंदाच्या उन्हाळी वेळापत्रकात प्रवासी सेवेत येणार आहे. एअर इंडिया ही अद्ययावत विमाने दिल्ली-टोकियो (हानेडा), मुंबई-लंडन (हीथ्रो) आणि बंगळूर-लंडन यांसारख्या अधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गांवर चालविणार आहे.
