मुंबई : एअर इंडियाच्या एआय १७१ विमानाचा अपघात विद्युत बिघाड झाल्यामुळे इंधन स्विच बंद झाला असल्याचा संशय फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) यांनी व्यक्त केला आहे. तसेच या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे (गॅटविक) निघालेले बोइंग ७८७-८ विमान काही वेळातच कोसळले होते. या अपघातात २६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
अपघातावरील आपल्या प्राथमिक अहवालात, विमान अपघात तपास ब्युरोने विमानाने उड्डाण केल्यानंतर एका सेकंदाच्या अंतराने दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा खंडित झाल्यामुळे कॉकपिटमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे म्हटले आहे. ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एक वैमानिक दुसर्या वैमानिकाला त्याने संपर्क का तोडल्याचे विचारल्याचे ऐकू आले. त्यावर दुसर्या वैमानिकाने संपर्क तोडला नसल्याचे म्हटले होते.’ विमान अपघात तपास ब्युरोचा अंतिम अहवाल आला नसला तरी विद्युत प्रणाली तसेच विमानामधील इंधन नियंत्रण स्विचच्या कार्यप्रणालीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, एफआयपीने विमानाच्या उड्डाणापूर्वी विद्युत बिघाड होण्याची शक्यता असल्याबद्दल नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.
लिथियम-आयन बॅटरीमधील बिघाड, असामान्य व्होल्टेजखालील रिलेची कार्यपद्धती आणि बोईंग ७८७ च्या विद्युत रचनेच्या आधारावर, उड्डाणापूर्वीच्या विद्युत बिघाडामुळे वैमानिकाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अनपेक्षितपणे रिले कार्यान्वित होऊन दोन्ही इंजिनांमधील इंधनपुरवठा खंडित होऊ शकला असता,’ असे एफआयपीने १ मे रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
‘आयआयटी मुंबईची मदत घ्या’
वैमानिक संघटनेने आयआयटी मुंबई, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यामार्फत सविस्तर विद्युत विश्लेषणाद्वारे तपासणीची मागणी केली आहे.
