मुंबई : एअर इंडियाची हवाई प्रवासी वाहतुकीसह वैद्यकीय मदतीसाठी विनामूल्य धाव सुरू आहे. एअर इंडियाने आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाशी भागीदारीतून एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत डोळ्याच्या बाहुलीचे ४३१ पारदर्शी पडदे (कॉर्निया) देशभरात पोहोचवले. यामुळे देशातील शेकडो अंधांना दृष्टी मिळाली आहे.
नेत्रऊतींच्या जलद व सुरक्षित हालचालीसाठी एअर इंडियाकडून ही वाहतूक विनामूल्य व प्राधान्यक्रमाने केली जाते. एअर इंडियाच्या देशांतर्गत विमानसेवेच्या माध्यमातून विविध शहरांमधील नेत्रपेढ्यांपर्यंत कॉर्निया वेळेवर पोहोचवले जातात. ज्यामुळे प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांना मदत होते.
हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद नेत्र संस्थेच्या रामायम्मा आंतरराष्ट्रीय नेत्र बँकेतून मिळवलेला डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शी पडदा भुवनेश्वर येथील दृष्टी दान नेत्र बँकेशी संलग्न असलेल्या रुग्णासाठी असतो. तेव्हा दानापासून प्रत्यारोपणापर्यंतच्या प्रवासात अंतर हे सर्वात मोठे आव्हान असते.
दान केलेले ऊतक असलेला उष्णतारोधक कंटेनर विमानतळावर इतर प्रवाशांचे क्वचितच लक्ष वेधून घेतो. कारण सार्वजनिक ध्वनिप्रणालीवरून त्याची उद्घोषणा केली जात नाही. सहप्रवाशांना ते विमानात असल्याची कल्पनाही नसते. कॉर्नियाच्या जलद वाहतुकीमुळे अंध व्यक्तीवर तातडीने प्रत्यारोपण करता येते. त्यामुळे ती आपल्या प्रियजनांचे चेहरे पाहू शकते, एखादा विद्यार्थी आत्मविश्वासाने शाळेत जाऊ शकतो. तसेच कॉर्नियाची हवाई वाहतूक भारतातील नेत्रपेढ्यांसाठी वेग आणि विश्वासार्हता निर्माण करीत आहे.
वैमानिक, विमानतळ पथके, मालवाहू कर्मचारी, नेत्रपेढी समन्वयक व वैद्यकीय व्यावसायिक यांच्या अथक प्रयत्नांमुळे कॉर्नियाची वाहतूक सहज शक्य होत आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत, एअर इंडियाने संपूर्ण भारतात ४३१ कॉर्नियांची वाहतूक केली आहे. दरवर्षी एअर इंडियाची हजारो विमाने शहरे, कुटुंबे, व्यवसाय व स्वप्नांना जोडण्यासाठी उड्डाण करतात. त्यांपैकी काही मोजक्याच प्रवासात कॉर्नियासारख्या मौल्यवान गोष्टीची वाहतूक होते.
