मुंबई : हवाई निर्बधांमुळे विमानांना वळसा घालावा लागत असल्याने भारतीय विमान कंपन्यांना दररोज १५० – २०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. विमान कंपन्यांचा सर्वाधिक खर्च इंधनावर होतो. त्यातच वळसा मार्गांमुळे इंधन खर्चात वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या विमान वाहतूक उद्योगाला जवळपास १८ हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशिया हा भारताच्या विमान कंपन्यांसाठी, विशेषतः दोन सर्वात मोठ्या कंपन्या इंडिगो आणि एअर इंडियासाठी एक व्यस्त प्रदेश मानला जातो. नागरिकांच्या विमान प्रवासासह हा प्रदेश भारताला युरोप, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेशी जोडणारा प्रमुख हवाई मार्ग आहे. उड्डाणांमधील व्यत्यय, प्रवाशांना परतावा, वाढलेला परिचालन खर्च आणि परकीय चलन तोटा या कारणांमुळे, भारतीय विमान वाहतूक उद्योगाला २०२५-२६ या आर्थिक वर्षात १७ ते १८ हजार कोटी रुपयांचा निव्वळ तोटा होण्याचा अंदाज ‘इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी’ने (आयसीआरए) फेब्रुवारी २०२६ च्या अहवालात वर्तवला आहे.

तणावाचे मार्ग

  • भारत – यूएई मार्ग (दुबई, अबू धाबी, शारजा) : सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय मार्ग
  • भारत – सौदी अरेबिया मार्गे जेद्दाह आणि रियाधकडे
  • दिल्ली – मुंबई ते लंडन, जेएफके आणि नेवार्क यांसारख्या भारत – युरोप,भारत – अमेरिका लांब पल्ल्याच्या सेवा.

प्रवास वाढला

युरोपला जाणारी विमाने ओमान, दक्षिण सौदी अरेबिया आणि इजिप्तमार्गे वळवण्यात येत आहेत. एअर इंडिया न्यूयॉर्क (जेएफके) आणि नेवार्कसाठी रोममध्ये इंधन भरण्यासाठी थांबा घेऊन विमान सेवा चालवत असल्याने एकूण प्रवासाच्या वेळेत दोन ते चार तासांची वाढ होत आहे. पश्चिमेकडे जाणाऱ्या विमानांनी रशिया आणि मध्य आशियामार्गे उत्तरेकडे वळसा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु हा मार्ग भू-राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि कार्यान्वयनाच्या दृष्टीने खर्चिक आहे.

गल्फ कॉरिडॉर महत्त्वाचा का

भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीपैकी सुमारे ५० टक्के वाटा आखाती बाजारपेठेचा आहे. थेट प्रवासाव्यतिरिक्त दुबई, अबू धाबी, मस्कत आणि दोहा यांसारख्या केंद्रांमार्फत पश्चिम आशिया हा भारतासाठी युरोप, आफ्रिका आणि अमेरिका खंडांना जोडणारा प्रमुख दुवा आहे.

सर्वाधिक फटका कोणाला ?

इंडिगो सर्वाधिक प्रभावित भारतीय विमान कंपनी आहे. इंडिगोच्या एकूण क्षमतेपैकी सुमारे १५-२० टक्के क्षमता पश्चिम आशियाशी संबंधित आहे. एअर इंडियालाही लांब पल्ल्याच्या मार्गांवर वाहतूकविषयक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकासा एअर, स्पाईसजेट या भारतीय विमान कंपन्यांसह एमिरेट्स, कतार एअरवेज, एतिहाद, फ्लायदुबई आणि सौदिया या परदेशी विमान कंपन्यांनीही हवाई सेवा थांबविली आहे. पाकिस्तानने २३ मार्चपर्यंत ‘नोटिस टू एअरमेन’ (NOTAM) अंतर्गत भारतीय विमानांना आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यावर बंदी घातल्याने भारतीय विमान कंपन्यांना युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या थेट उत्तर कॉरिडॉरचा वापर करता येत नाही.