मुंबई : एअर इंडिया, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांना वाय-फाय इंटरनेट सेवा पुरविते. यामुळे प्रवासी ३५ हजार फुटांवरही सोशल मीडिया, ई-मेल, आवडते कार्यक्रम आणि चित्रपट ऑनलाइन पाहू शकतात. जून २०२५ ते जून २०२६ दरम्यान एअर इंडियाच्या विमानांमधील १० लाखांहून अधिक प्रवाशांनी इनफ्लाइट वाय-फाय सेवेचा लाभ घेतला आहे.

दररोज ५५ हून अधिक विमानाचे उड्डाण करणारी एअर इंडिया प्रवाशांना त्यांच्या विमान प्रवासादरम्यान अखंड इंटरनेट सुविधा देते. यामुळे प्रवाशांना ईमेल तपासणे किंवा समाज माध्यमे पाहणे शक्य होते. वर्षभरात वायफायच्या वापरात सातत्याने वाढ झाली असून विमानातील वाय-फायचा वापर जून २०२५ मधील ३० टक्यांवरून जून २०२६ मध्ये ५५ टक्यांपर्यंत वाढला आहे.

जवळपास ८९ टक्के कनेक्टेड प्रवासी हे प्रवासादरम्यान समाज माध्यमे पाहणे निवडतात. उर्वरित ११ टक्के प्रवाशांनी वेब ब्राउझिंग, ईमेल आणि मेसेजिंग ॲप्सचा पर्याय निवडला आहे. या सेवेच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे वर्षभरात जवळपास ५०० टीबी डेटाचा वापर झाला. श्रेणीनुसार, एकूण वापरामध्ये स्ट्रीमिंग सेवांचा वाटा ८६ टक्के तर उर्वरित १४ टक्के वेब ब्राउझिंगचा होता.

सध्या ही आकडेवारी २८ वाय-फाय सुविधायुक्त विमानांची आहे . ही विमाने लंडन, न्यूयॉर्क, नेवार्क, फ्रँकफर्ट, मेलबर्न, हाँगकाँग, सिंगापूर, बाली आणि मॉरिशस यांसारख्या जगभरातील शहरांमध्ये उड्डाणे करतात. या वाय-फाय सेवेद्वारे प्रवाशांना त्यांचे लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोन्सवर इंटरनेट वापरता येते.

विमान १० हजार फूट उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांची उपकरणे इंटरनेटला जोडण्याची परवानगी मिळते. एअर इंडिया ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इन-फ्लाइट इंटरनेट देणारी भारतातील पहिली विमान कंपनी ठरली आहे. ही सुविधा प्रामुख्याने एअरबस ए ३५०, बोईंग ७८७-९ (ड्रीमलाइनर) आणि निवडक एअरबस विमानांमध्ये दिली जाते.