मुंबई : एअर इंडियाने इंधनाच्या वाढत्या किंमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे दरमहा सुमारे ४०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा मर्यादित केली आहेत. एअर इंडियाच्या विमानांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरावर झाला आहे. दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचे तिकीट तब्बल २ लाख ७६ हजारांच्या घरात पोहोचले आहे. याशिवाय अनेक मार्गावरील तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
वाढता तोटा कमी करण्यासाठी एअर इंडियाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, दिल्ली-शिकागो, न्यूयार्कसह प्रमुख मार्गांवरील विमानोड्डाणांमध्ये कपात केली आहे. या कपातीचा प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरोप आणि आग्नेय आशियाई मार्गांवर परिणाम झाला आहे. दर महिन्याला सुमारे ४०० उड्डाणे कमी होणार आहेत. तर दरमहा १,२०० हून अधिक उड्डाणे सुरू राहणार आहेत.
इराणमधील युद्ध सुरू झाल्यापासून जेट इंधनाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्यामुळे विमानप्रवास महाग होत आहे. इंधनाच्या किमती वाढत असल्याने विमान कंपन्यानी तोटा कमी करण्यासाठी विमान संख्येत कपात करण्यात सुरुवात केली आहे. एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात तीन महिन्यांसाठी कपात केली आहे. एअर इंडियाच्या या निर्णयाचा थेट परिणाम उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी किंवा व्यावसायिक दौर्यांसाठी आधीच तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांवर झाला आहे.
वाहतूक खर्च ६० टक्यांवर
विमान तिकिटे महाग असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे विमान इंधन. विमान कंपनीच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३०-४० टक्के खर्च इंधनावर होतो. जेव्हा जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा विमान कंपन्यांना हा खर्च प्रवाशांवर टाकावा लागतो. सध्या विमान इंधनाच्या किमती वाढल्याने विमान कंपन्याचा वाहतूक खर्च ४० टक्यांवरून ६० टक्क्यावर पोहोचला आहे.
प्रवाशांचे हाल
– वाढत्या इंधन दरांचा थेट परिणाम विमान सेवांवर होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीकरिता मुंबई, दिल्लीसह विविध राज्यांत आलेले प्रवासी जून महिन्यात पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतील.
– जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रथ यात्रा, स्वांतत्र दिन, ओनम, रक्षाबंधन हे सण आहेत.
– या सणानिमित्त परदेशातून आपल्या मूळ घरी येणार्या प्रवाशांची संख्या मोठी असते. विमान कपातीमुळे परदेश प्रवास करणार्यांसाठी जून ते ऑगस्ट तीन महिने आव्हानात्मक ठरणार आहेत.
