मुंबई : उड्डाण केल्यानंतर इंजिन बंद पडल्याने एअर इंडियाच्या मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाने आपत्कालीन परिस्थितीचा इशारा (इमर्जन्सी ‘पॅन-पॅन’ कॉल) दिला. त्यानंतर तात्काळ ४७ प्रवासी असलेले विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरविण्यात आले आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुंबई विमानतळावरून एअर इंडियाच्या एआय २८१२ या ए३२० निओ विमान गुरुवारी मध्यरात्री २ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण करणार होते. मात्र विमानाने मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास उड्डाण केले. उड्डाणानंतर अवघ्या २० मिनिटांत म्हणजेच २ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आहे. वैमानिकाने तात्काळ आपत्कालीन परिस्थितीचा इशारा दिला. त्यानंतर तात्काळ हे विमान मुंबई विमानतळावर परविण्यात आले. विमानाचे उड्डाण होत असताना एक विशिष्ठ आवाज झाला व त्यातून ठिणग्या पडल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी मुंबईहून बंगळुरुकडे जाणारे विमान संभाव्य तांत्रिक बिघाडाच्या संशयावरून खबरदारीचा उपाय आणि प्रमाणित कार्यपद्धतींनुसार, उड्डाणानंतर काही वेळातच मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. या विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरविण्यात आले असून एअर इंडियाच्या सुरक्षा मानकांनुसार सध्या त्याची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे. विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे लोकल स्टँडबाय घोषित केला होता. त्यानुसार विमानाचे सुरक्षितपणे उतरविण्यात आले.
४७ प्रवासी सुरक्षित
या विमानात एकूण ४७ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांसह विमान धावपट्टीवर सुखरुप सुखरुप उतरले असून पुढील तपासणीसाठी त्याचे उड्डाण रोखण्यात आले आहे. प्रवाशांसाठी एका पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. पर्यायी विमानाने पहाटे पावणे पाचच्या सुमारास बंगळुरूकरिता उड्डाण केले.
आपत्कालीन परिस्थितीतील इशारा म्हणजे काय ?
विमानाने हवेत उड्डाण घेतल्यानंतर काही बिघाड वाटला, तर तातडीच्या मदतीसाठी आपत्कालीन परिस्थितीचा इशारा देण्यात येतो. हा इशारा आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील आपत्कालीन संकेत आहे. हा इशारा तीन वेळा (पॅन-पॅन, पॅन-पॅन, पॅन-पॅन) उच्चारला जातो. म्हणजेच असे एकूण सहा वेळा उच्चारावे लागते. विमानात एक तातडीची परिस्थिती निर्माण झाल्याचे या संकेताद्वारे सूचित केले जाते. ही परिस्थिती प्राधान्याने हाताळण्याची आवश्यकता असते. तातडीने मदतीची गरज असल्याचे समजले जाते. यामध्ये तांत्रिक समस्या, इंधन कमी असणे किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती यांसारख्या बाबींचा समावेश आहे. विमानांसोबतच जहाजेही हा इशारा देतात.
