मुंबई : गणेशोत्सवात एअर इंडियाने मुंबई व दिल्ली विमानतळाच्या लाउंजमध्ये मोदकापासून मसाले भातापर्यंतचे खास पदार्थ ठेवले आहेत. या उपक्रमाद्वारे प्रवाशांना विमानतळावरच सणाचा पारंपरिक अनुभव व मराठी खाद्यसंस्कृतीची चव चाखता येत आहे.

मुंबई-दिल्लीदरम्यान सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर एअर इंडिया दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी व्हावा यासाठी एअर इंडियाने ही विशेष मेजवानी आयोजित केली आहे. मुंबई व दिल्ली येथील इंटरनॅशनल महाराजा लाउंजमध्ये १४ सप्टेंबरपासून ११ दिवसांचा खास उत्सव आयोजित केला आहे. पारंपरिक चवीसह गुलकंद, केशर, ऑरेंज चॉकलेट बटरस्कॉच, शुगर-फ्री खजूर व ड्रायफ्रूट, नाचणी व बेरी चीजकेक फ्लेव्हर्सचे आधुनिक मोदकही ठेवण्यात आले आहेत. मुंबई लाउंजमध्ये कोल्हापुरी चिकन बिर्याणी, मालवणी फिश करी व मिसळ पाव यांसारख्या पदार्थांसह महाराष्ट्रीयन बफे उपलब्ध आहे.

हवाई प्रवाशांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची व परंपरेची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गणपतीचा आवडता मोदक व इतर गोड पदार्थ, मुंबईसह दिल्लीच्या ‘महाराजा लाउंज’मध्येही उपल्बध आहे. एअर इंडियाने भारतीय संस्कृती व पाहुणचाराची परंपरा जागतिक प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.