मुंबई : मुंबईतून थेट टोरोंटो अशी विमानसेवा सुरू होत असून एअर इंडियाचे या मार्गावर विमान सुरू होणार आहे. या हिवाळी हंगामात मुंबई व टोरोंटो दरम्यान आठवड्याला तीनदा बोइंग ७७७-३००ईआर हे विमान उड्डाण करेल. मुंबई-टोरोंटो या मार्गावर थेट सेवा देणारी एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी आहे. ही सेवा २५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून २६ मार्च २०२७ पर्यंत असेल. एअर इंडियाने आपल्या दिल्ली-टोरोंटो विमान सेवा अधिक दर्जेदार करतानाच मुंबई आणि टोरोंटो दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

भारत आणि कॅनडा दरम्यानची हवाई जोडणी अधिक मजबूत करणे आणि प्रवाशांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश आहे. यंदा, २०२६-२७ च्या हिवाळी हंगामात, एअर इंडिया भारत व कॅनडा दरम्यान २० साप्ताहिक उड्डाणे होतील. त्यात दिल्ली ते टोरोंटो १० साप्ताहिक उड्डाणे, मुंबई ते टोरोंटो तीन साप्ताहिक उड्डाणे व दिल्ली ते व्हँकुव्हर सात साप्ताहिक उड्डाणांचा समावेश आहे. या नव्या सेवेमुळे भारत व कॅनडादरम्यान दर आठवड्याला जवळपास दोन हजार जागा वाढतील. मुंबई-टोरोंटो विमानसेवा एअर इंडियाच्या बोईंग ७७७-३००ईआर विमानांमधून चालवली जाणार आहे. या विमानात अद्ययावत केबिन इंटिरियर्स आहेत. तसेच ८ प्रथम श्रेणी स्वीट्स, ४० फ्लॅट-बेड बिझनेस क्लास सीट्स व २८० इकॉनॉमी क्लास सीट्स उपलब्ध असतील. प्रवाशांना अद्ययावत ७७७-३००ईआर विमानात वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही लाभ मिळेल.

इतर राज्यांतील प्रवाशांना दिलासा

  • एअर इंडियाच्या मुंबई व दिल्ली येथील केंद्रामार्फत, कॅनडाला ये-जा करणारे प्रवासी अहमदाबाद, अमृतसर, बंगळूर, चंडीगड, चेन्नई, हैदराबाद, कोची, लुधियाना व बडोदे यांसारख्या भारतातील इतर अनेक शहरांशी सहजरीत्या जोडल्या जातील.
  • आसन क्षमतेत ७१ टक्यांनी वाढ दिल्ली व मुंबईहून टोरोंटोसाठी नव्या व अद्ययावत विमानांच्या तैनातीमुळे एअर इंडियाला या हिवाळ्यात टोरोंटोसाठी प्रीमियम आसन क्षमता ७१ टक्यांनी वाढवता येईल. यामुळे प्रवाशांना अधिक फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास व प्रीमियम इकॉनॉमीचे पर्याय उपलब्ध होतील.