मुंबई : एअर इंडियाने नवरात्रीत उपवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास नवरात्री थाळी आणि व्रत-स्पेशल मेन्यू जाहीर केला आहे. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद विमानतळावरून सुटणाऱ्या सर्व विमानांमध्ये हा खास सात्विक आहार दिला जाणार आहे. उपवासाच्या सर्व नियमांचे पालन करून ही थाळी पूर्णपणे शुद्ध तूप आणि सैंधव मिठाचा वापर करून तयार करण्यात आली आहे.
दिल्लीच्या टर्मिनल ३ मधील लाउंज आणि मुंबईच्या टर्मिनल २ मधील अदानी लाउंजमध्ये खास सणासुदीचा मेनू प्रवाशांकरिता उपलब्ध आहे. नवरात्रीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानात आणि दिल्ली व मुंबईतील लाउंजमध्ये खास सणासुदीच्या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. हा विशेष मेन्यू १० ते २० ऑक्टोबर या १० दिवसांच्या उत्सवादरम्यान उपलब्ध असणार आहे.
- नाश्त्यामध्ये कुरकुरीत बटाट्याच्या सलीसोबत साबुदाणा खिचडी, व्रतवाले शाही आलू आणि शिंगाड्याच्या पुरीचा समावेश आहे. सोबतच ताजी फळे, साधे दही आणि पाणी दिले जाणार आहे.
- अल्पोपाहाराच्या वेळी, प्रवासी साबुदाणा वडा, सैंधव मीठ आणि पुदिन्याच्या चटणीने बनवलेला गरम आलू चाट आणि दही, काजू व सुगंधी मसाल्यांचा पनीर टिक्का, यांसोबत साबुदाणा फ्रुट खीर आणि ताजी फळे यांचा आस्वाद घेऊ शकतात.
- दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात उपवासाचा शाही पनीर, व्रतवाली कद्दूची भाजी, समक जिरा राईस आणि शिंगाड्याची पुरी घेऊ शकतात. यासोबत फळे, दही आणि साबुदाणा फ्रुट खीर दिली जाणार आहे.
दिल्ली, मुंबईतही लज्जतदार खानपान
दिल्लीतील प्रमुख महाराजा लाउंजमध्ये साबुदाणा खिचडी, फराळी मिसळ, फराळी कचोरी, शकरकंदी की टिक्की, साबुदाणा वडा, राजगिऱ्याचे खास पदार्थ आणि मागणीनुसार मखाना खीर यांसारख्या आवडत्या पदार्थांचा समावेश आहे. यासोबतच, एक खास नवरात्री फूड कार्ट देखील आहे. गाजर मावा रोल, ऑरेंज रवा केक आणि पम्पकिन चीझकेक यांसारख्या केशरी रंगाच्या पदार्थांपासून ते रेड वेलवेट ब्राउनीज, रॉयल ब्लू ब्लूबेरी चीझकेक, यलो मँगो चीझकेक, ग्रीन किवी मूस, पर्पल याम स्विस रोल्स आणि मोराच्या थीमवर आधारित गोड पदार्थांपर्यंतचा समावेश आहे. बनाना चिप्स, राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, राजगिरा चिक्की, बनाना वेफर्स आणि शेंगदाणा चिक्कीचा आस्वाद देखील प्रवासी घेऊ शकतात.
