मुंबई : इंधनाच्या किंमती, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि विमानांच्या उड्डाणांना होणारा विलंब यांमुळे एअर इंडियाचा आर्थिक वर्ष २०२६ मधील निव्वळ तोटा २६ हजार ८०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एअर इंडियाचा तोटा बारा पटींनी वाढला असून आतापर्यतचा एका वर्षातील सर्वात मोठा तोटा आहे.
टाटा समूहाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एअर इंडियाने आर्थिक वर्ष २०२६ साठी ३.५६ अब्ज सिंगापूर डॉलर (सुमारे २६,८०० कोटी रुपये) निव्वळ तोटा नोंदवला आहे. याच कालावधीत महसूल दुप्पटीहून अधिक वाढला असतानाही, हा तोटा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १२ पटींनी अधिक आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एअरलाइनने आपल्या कामकाजाचा विस्तार केला. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एअर इंडियाचा महसूल १०.५३ अब्ज सिंगापूर डॉलर (सुमारे ७९,२१९ कोटी रुपये) पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला. या विलीनीकरणामुळे सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहाच्या मालकीच्या या विमान कंपनीमध्ये २५.१ टक्के भागधारक बनली. एअर इंडियाला हवाई क्षेत्रावरील निर्बंध, मध्य पूर्वेकडील प्रमुख बाजारपेठांमधील कामकाजावरील मर्यादा आणि वाढलेल्या जेट इंधनाच्या किमती यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
युद्धाचा परिणाम
पश्चिम आशियातील संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतीय विमान कंपन्यांचा, विशेषतः लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील, परिचालन खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. एअर इंडियासाठी, लांबलेले उड्डाण मार्ग आणि वाढत्या इंधन वापरामुळे नफ्यावर तीव्र परिणाम झाला आहे. भारतीय रुपयाच्या अवमूल्यनामुळे भाडेपट्टीचे भाडे, देखभाल खर्च आणि इतर डॉलर-संबंधित खर्चांमध्ये आणखी वाढ झाली आहे.
नविन विमानांना विलंब
एअर इंडियाला जागतिक विमान पुरवठा साखळीतील व्यत्ययांशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बोईंग आणि एअरबस या दोन्ही कंपन्यांमधील विलंबामुळे एअरलाइनने मागवलेल्या नवीन विमानांच्या वितरणास विलंब झाला आहे. तर जुन्या विमानांच्या नूतनीकरणाचे वेळापत्रकदेखील निर्धारित वेळेच्या खूप मागे पडले आहे.
