मुंबई : सौदीला जाणाऱ्या प्रवासाला झालेला विलंब आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन चुकल्याबद्दल ग्राहक आयोगाने एअर इंडियाला जबाबदार धरत, केरळमधील एका प्रवाशाला जवळपास नऊ वर्षांनंतर १.३६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणास विलंब झाल्याने केरळचा एक प्रवासी मुंबई विमानतळावर रात्रभर अडकून पडला होता. या निर्णयामुळे, कामकाजातील व्यत्ययांमुळे प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्यास पुरेशी मदत पुरवण्याची विमान कंपन्यांची जबाबदारी अधिक दृढ झाली आहे.

केरळचा एक प्रवासी २०१७ साली एअर इंडियाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (सीओके) मुंबईमार्गे दम्ममला प्रवास करणार होता. ग्राहकाच्या तक्रारीनुसार, विमान कंपनीच्या देशांतर्गत विमानाला झालेल्या विलंबामुळे त्याचे पुढील आंतरराष्ट्रीय विमान चुकले, त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी रात्रभर मुंबई विमानतळावर थांबावे लागले. यामुळे त्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान झाले.शिवाय गैरसोय आणि मानसिक त्रास झाला.

प्रवाशाने असा युक्तिवाद केला की, विलंब होऊनही एअर इंडिया वेळेवर मदत पुरवण्यात अपयशी ठरली. त्याच्या दाव्यानुसार, या व्यत्ययामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय आणि अनावश्यक त्रास झाला. विमान कंपनीशी थेट संपर्क साधून प्रकरण सोडवण्याचे वारंवार प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, त्याने सेवेतील त्रुटींबाबत आरोप करत ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने त्याच्या बाजूने अंतिम निकाल देण्यापूर्वी ही कायदेशीर प्रक्रिया जवळपास नऊ वर्षे चालली.

विमान उड्डाणास विलंब झाल्यामुळे प्रवाशाच्या प्रवासाच्या नियोजनाचे तीनतेरा वाजले. विमान कंपनी प्रवाशाप्रति असलेले आपले कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरली, असे ग्राहक आयोगाला आढळले. विमान कंपनीने परिस्थिती हाताळण्याची पद्धत ही ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार अपुरी सेवा ठरते, असा निकाल आयोगाने दिला. या रकमेमध्ये आर्थिक नुकसानीची भरपाई, मानसिक त्रासाची भरपाई आणि खटल्याशी संबंधित खर्चाचा समावेश आहे.

जेव्हा कधी उड्डाणात व्यत्यय येतो, तेव्हा प्रवासाच्या नोंदी, बोर्डिंग पास, तिकिटे आणि विमान कंपन्यांशी झालेला संवाद जपून ठेवण्याचे महत्त्व हा निकाल अधोरेखित करतो. अशी कागदपत्रे अनेकदा ग्राहक विवादांमध्ये महत्त्वपूर्ण पुरावे ठरतात. विमान कंपन्यांसाठी हा निकाल प्रभावी व्यत्यय व्यवस्थापन आणि प्रवाशांना त्वरित साहाय्य देण्याची गरज अधोरेखित करतो.