मुंबई : एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानाच्या उड्डाणाची निर्धारित उंची अचानक कमी होण्याच्या घटनेच्या प्राथमिक चौकशीत, प्रणालीतील बिघाडामुळे विमानावरील नियंत्रण क्षणभर सुटल्याचे निष्पन्न झाले. वैमानिकाच्या दोन स्वतंत्र चाचण्यांमध्ये मादक पदार्थ सापडले असून दोन्ही चाचण्यांमध्ये गांजाच्या सेवनाची पुष्टी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अपघात तपास विभागाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) तातडीने योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

तीन लहान मुलांसह १३७ प्रवासी व आठ कर्मचाऱ्यांना घेऊन ४ ऑगस्ट रोजी, एअरबस ए ३२० विमान फुकेतहून दिल्लीला येत होते. विमानाच्या निर्धारित उड्डाण उंचीतील बदलामुळे झालेल्या अपघातात २० प्रवासी व चार कर्मचारी जखमी झाले होते. सुरुवातीला ही घटना टर्ब्युलन्स (उड्डाणातील तीव्र बदल) घडल्याचे सांगितले गेले होते. परंतु, नंतरच्या तांत्रिक तपासणीत विमानाची हायड्रॉलिक प्रणाली काही सेकंदांसाठी निकामी झाल्याचे व ऑटोपायलट डिस्कनेक्ट झाल्याचे समोर आले. विमानाच्या ‘ग्रीन हायड्रॉलिक’ यंत्रणेमध्ये पहाटे ४.०२ च्या सुमारास बिघाड नोंदवला गेला. सुमारे एका सेकंदानंतर ‘ब्लू’ व ‘यलो’ हायड्रॉलिकमध्येही बिघाड झाला. या घटनेमुळे विमानाच्या दोन्ही बाजूंच्या ‘एलिव्हेटर’ व ‘एलरॉन’ नियंत्रण प्रणालींवर तात्पुरता परिणाम झाला होता.

विमान अपघात तपास विभागाने अहवालात या घटनेला कारणीभूत ठरलेल्या मूळ कारणाचा खुलासा करणे टाळले आहे, परंतु अमली पदार्थ चाचणीतील निष्कर्ष ही एक ‘गंभीर चिंतेची बाब’ असल्याचे नमूद केले आहे. तसेच विमानचालन नियामकाने ‘प्राधान्याने योग्य कारवाई’ करावी अशी शिफारस केली आहे. विमानाच्या फ्लाइट-कंट्रोल प्रणालीत सर्वप्रथम हिरव्या हायड्रॉलिक सिस्टीममधील दाब कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पुढील काही सेकंदातच, निळ्या व पिवळ्या हायड्रॉलिक सिस्टीममध्येही कमी दाब झाला होता.

३०० नव्हे ६७६ फूट खाली

घटनेच्या वेळी विमान ३६ हजार १ फूट उंचीवर उडत होते. काही वेळाने अचानक विमान ३६ हजार ४०१ फुटांवर गेले आणि काही क्षणांत ६७६ फूट खाली आले. तेव्हा विमान ३५ हजार ७२५ फुटांवर होते.