मुंबई : केंद्र सरकारने फुकेत – दिल्ली विमानप्रकरणी एअर इंडियाला हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासह आणि विमानांच्या देखरेखीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरी उड्डाण महासंचालनालयाला (डीजीसीए) ‘डॉप टेस्ट’च्या नियम अधिक कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (एआय २३७९) झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ आणि विमान अचानक ३०० फूट खाली जाण्याच्या प्रकरणातील ‘डॉप टेस्ट’मध्ये (सायकोएक्टिव्ह पदार्थांच्या सेवनाबाबत) मुख्य वैमानिकाने गांजा घेतल्याचे निष्पन्न झाल्याने हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. या घटनेनंतर वैमानिकासह विमान कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या नियमांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होणार आहे.
वैमानिक वैयक्तिक समस्यांनी ग्रस्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकेट – दिल्ली एअर इंडियाचा मुख्य वैमानिक वैयक्तिक समस्यांनी ग्रस्त होता. त्यामुळे त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. झोपेच्या गोळ्यांमुळे वैमानिकाची पहिली आणि दुसरी डॉप टेस्ट सकारात्मक आली. शिवाय इतर सह विमान कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैमानिकाचे वर्तन तपासण्यात येणार आहे.
‘एएआयबी’कडे प्रकरणाचा तपास
– गेल्या जून महिन्यात अहमदाबाद – लंडन विमानाच्या अपघाताचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. त्यातच या घटनेत एअर इंडियाच्या वैमानिकाने नशा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे केंद्र सरकारने ही घटना गांभीर्याने घेतली आहे.
– फुकेत-दिल्ली विमानाचा सुदैवाने अपघात झाला नाही. अहवालानुसार विमान जेव्हा ओडिसा येथून जात होते, त्यावेळी विमानाचे तीन हाइड्रोलिक सिस्टम, दरवाजे आणि एलिव्हेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले होते.
– विमानातील तांत्रिक समस्या तपासण्यासाठी एअरबसचे एक पथक आणि फ्रान्स विमान नियामक अधिकारी भारतात आले आहेत. त्यांच्यासह विमान अपघात तपास विभाग (एएआयबी) या प्रकरणाची तपासणी करीत आहे.
