मुंबई : मंगळवारी सकाळी फुकेतहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान पूर्व किनाऱ्यावरून भारतीय भूमीत प्रवेश केल्यानंतर आकाशात तीव्र वाऱ्यांचा सामना करीत ३०० फूट खाली आले होते. ९० सेकंद (दीड मिनिट) चाललेल्या वादळी स्थितीत १३ प्रवासी व ४ कर्मचारी जखमी झाले होते. विमानाची कमाल उड्डाण उंची कमी झाल्याने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान क्लिअर एअर टर्ब्युलन्समुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एअर इंडियाच्या २३७९ एअरबस ए३२० विमानात, तीन लहान मुलांसह १३७ प्रवासी व सहा केबिन क्रू सदस्यांसह आठ कर्मचारी प्रवास करीत होते. विमान ओदिशा राज्य प्रदेशात आल्यानंतर सुमारे ३२ हजार फूट उंचीवर होते. सकाळी ९.३६ वाजता विमान हवेत असताना वेगवान वाऱ्यांमुळे विमान सुमारे दीड मिनिटे कंपन स्थितीत राहिले. या प्रभावाने विमानाची उंची अचानक ३०० फुटांनी कमी झाली. या अचानक बदलामुळे आसनपट्टा न लावलेले प्रवासी व कर्मचारी आदळले. या घटनेदरम्यान केबिनमधील दाब अचानक कमी झाल्यामुळे एका ठिकाणी छताचा आतील पॅनल फाटला. २३७९ एअरबस ए३२० हे विमान सात वर्षे जुने आहे.

क्लिअर एअर टर्ब्युलन्सची शक्यता

ही घटना उड्डाण मार्गावरील अनपेक्षित स्वच्छ हवेतील वादळी वाऱ्यांशी संबंधित होती का, हे निश्चित करण्यासाठी हवामान अहवालांसोबतच विदा (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) व कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सविस्तर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

‘टर्ब्युलन्स’ म्हणजे काय

हवेच्या प्रवाहात अचानक निर्माण होणारी अस्थिरता वा वेगातील बदलाला टर्ब्युलन्स (अशांतता) म्हणतात. विमान प्रवासात टर्ब्युलन्समुळे विमानाला जोरदार धक्के बसतात. हवेच्या हालचालीनुसार टर्ब्युलन्सचे प्रकार आहेत.

-क्लिअर एअर टर्ब्युलन्स : हा स्वच्छ आकाशात प्रामुख्याने जेट स्ट्रीममुळे होतो. ढग नसल्यामुळे याचा रडारवर आधीच अंदाज येत नाही. हे सर्वात धोकादायक टर्ब्युलन्स मानले जाते.

  • थर्मल टर्ब्युलन्स : सूर्याच्या उष्णतेने जमीन तापल्यामुळे गरम हवा वेगाने वर जाते. त्या प्रवाहातून विमान गेल्यावर हा टर्ब्युलन्स जाणवतो.
  • वेक टर्ब्युलन्स : एखादे मोठे विमान हवेतून जात असताना त्याच्या मागे हवेचे भोवरे किंवा पाठीमागचा प्रवाह तयार होतो. त्या मागून येणारे दुसरे विमान या भोवऱ्यात अडकल्यास धक्के बसतात.
  • मेकॅनिकल टर्ब्युलन्स : डोंगर, इमारती वा झाडे यांसारख्या मोठ्या अडथळ्यांमुळे हवेचा प्रवाह विस्कळीत झाल्याने अशी स्थिती निर्माण होते.
  • फ्रंटल टर्ब्युलन्स : दोन वेगवेगळ्या तापमानाच्या हवेचे प्रवाह वा वस्तुमान एकमेकांसमोर आल्यास अशा घटना घडतात.
  • थंडरस्टॉर्म टर्ब्युलन्स : ढगांच्या गडगडाटात वरखाली जाणारे शक्तिशाली वाऱ्यांमुळे तीव्रता जाणवते.