मुंबई : फुकेतहून (थायलंड) दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या ‘एआय २३७९’ विमानाला तीव्र हवामानाचा (टर्ब्युलन्स) धक्का बसल्यामुळे अचानक ते ३०० फूट खाली आले. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेत १३ प्रवासी आणि ४ कर्मचारी (क्रू मेंबर) किरकोळ जखमी झाले. वैमानिकाच्या प्रसंगावधनामुळे विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या अपघातात प्रवाशांच्या कानाचा पडदा फाटला आणि खांद्याला दुखापत झाली आहे.

थायलंड येथील फुकेतहून मंगळवारी सकाळी ८.२५ च्या सुमारास एअर इंडियाचे विमान दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०७ च्या सुमारास विमान दिल्ली विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. विमान दिल्ली विमानतळावर उतरण्यासाठी सज्ज होत असताना तीव्र टर्बुलेंसमुळे (अचानक हवेत विमान खाली सरकणे) झालेल्या धक्क्यामुळे

विमान खाली आले. विमान अचानक खाली आल्याने विमानाच्या छताला प्रवासी धडकले. यात १० प्रवासी आणि ४ कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. दिल्लीत विमान उतरण्यापूर्वी काही वेळेआधीच ते अचानक खाली येऊ लागले आणि हवेत जोरात डगेमगू लागले. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी आरडाओरड केला. काही वेळासाठी विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैमानिकाने मोठ्या कौशल्याने आणि धैर्याने विमान सुरक्षित उतरविले.

या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा व आरोग्याला सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रभावित झालेल्या सर्व प्रवाशांना शक्य ती सर्व मदत पुरवली जात असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एअरबस ए ३२० निओ या विमानात १३७ प्रवासी आणि आठ कर्मचारी होते. ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.५० पर्यंत पाच प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर उर्वरित व्यक्तींवर उपचार आणि देखभाल सुरू आहे. एअर इंडियाची पथके रुग्णालयांमध्ये उपस्थित असून, सर्व आवश्यक मदत आणि पाठिंबा देण्यासाठी बाधित व्यक्तींच्या संपर्कांत आहेत.